मुंबई : एनआयएच्या (NIA) चौकशीतून वाचवण्याचे आमिष दाखवून गॅंगस्टर छोटा शकीलचा (Chhota Shakeel) साडू मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट (Salim Fruit ) याची 50 लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. विशाल देवराज सिंह उर्फ विशाल काळे, जाफर उस्मानी आणि पवन मूत्रेजा अशी अशी अटक करण्यात आलेल्या शंशयिताची नावे आहेत. दिल्ली येथून या संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून एनआयएने त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

  


​​सलीम फ्रूट याला 4 ऑगस्ट रोजी एनआयएने अटक केली असून त्याला 17 ऑगस्टपर्यंतची एनआयएची कोठडी सुनावण्यात आली आहे. सलीम याला अटक होण्याआधी विशाल याने दिल्लीतील एका बड्या नेत्याची आणि आपली ओखळ असून एनआयच्या चौकशीतून वाचण्यासाठी 50 लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. 


विशाल याच्या सांगण्यावरून सलीम याने 50 लाख रूपायांची रक्कम त्याला दिली. त्यानंतर पुढील डील करण्यासाठी सलीम याला दिल्लीला बोलवण्यात आले होते. त्यानुसार सलीम दिल्लीला गेला. काही दिवस दिल्लीत थांबल्यानंतर विशालने सलीम याला परत मुंबईला जाण्यास सांगितले. याची माहिती एनआयला मिळाली. त्यामुळे एनआयएने सलीम आणि विशाल या दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीनंतर विशाल याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  


 एनआयएने आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम शेख, छोटा शकील, जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना आणि टायगर मेमन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भारतात हिंसाचार पसरवण्यासाठी दाऊदने एक प्लॅन केला असून त्यासाठी त्याने भारतात एक युनिट तयार केल्याचा आरोप एनआयएने केला आहे.  


"दाऊद इब्राहिमने भारतात हिंसाचार पसरवण्यासाठी एक विशेष युनिट तयार केले आहे. त्यामाध्यमातून भारतातील बडे नेते आणि व्यावसायिकांना लक्ष्य करण्याची तयारी केली आहे. यातून दिल्ली आणि मुंबईसह इतर शहरांमध्ये हिंसाचार पसरवायचा दाऊदचा प्लॅन आहे, असे  एनआयएने आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.