नागपूर : कोरोना काळात जेव्हा सरकारी यंत्रणा महामारीशी लढण्यात व्यस्त होती, तेव्हा काही भामटे रेल्वे, एसबीआय, वेस्टर्न कोल फिल्ड सारख्या शासकीय व निमशासकीय विभागात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली राज्यातील शेकडो तरुणांची कोट्यवधींनी फसवणूक करत होते. नागपूर आणि भंडारा पोलिसांनी या टोळीतील काहींना पकडले असून टोळीतील म्होरक्या अजूनही फरार आहे. एकट्या नागपुरात आतापर्यंत 12 तरुणांनी त्यांची 1 कोटी 30 लाखांची फसवणूक केल्याची पोलिसांकडे तक्रार दिली असून शेकडो तरुण बदनामीपोटी समोर येऊन तक्रार देत नाहीत. दरम्यान, या टोळीविरोधात राज्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून त्या सर्वांचा एकत्रित तपास केल्यास फसवणुकीचे खूप मोठे प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे.  


रेल्वेत सेक्शन इंजिनीअरच्या पदावर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली कम्प्युटर इंजिनीअर असलेल्या 34 वर्षीय हा तरुणाची काही भामट्यानी 20 लाखांनी फसवणूक केली. पीडित तरुणाने सेवानिवृत्त वडिलांचे पेन्शनचे पैसे आणि आईचे दागिने गहाण ठेऊन रेल्वेतील नोकरीसाठी 20 लाखांची व्यवस्था केली होती. नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या राजेंद्र तिवारी नावाच्या माणसाने व्हॉट्सअॅपवर नियुक्ती पत्रही दाखवले होतं. मात्र, अनेक महिने वाट पाहूनही नोकरी न मिळाल्यामुळे या तरुणाने नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनमध्ये ऑगस्ट 2021 मध्ये तक्रार दिली. मात्र, आजवर त्याला न्याय मिळालेला नाही.


दरम्यान फसवणुकीच्या या प्रकरणात हा तरुण एकटाच बळी नसून याच पद्धतीने रेल्वे, एसबीआय, वेन्टर्न कोल फिल्ड सारख्या शासकीय किंवा निमशासकीय विभागात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली विदर्भात शेकडो तरुणांची फसवणूक झाली आहे. बेरोजगार तरुणांना फसवणारी ही टोळी आंतरराज्यीय असून त्यात महाराष्ट्रासह बंगाल आणि बिहारमधील काहींचा समावेश आहे. ही टोळी समाजात चांगली ओळख आणि प्रतिष्ठा असलेल्या दलालांच्या मार्फत उच्चशिक्षित मात्र बेरोजगार असलेल्या तरुणांना संपर्क साधते, त्यांना रेल्वे, एसबीआय, वेन्टर्न कोल फिल्ड्ससारख्या विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवते आणि नंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुलाखतीचा, नियुक्तीचं बोगस पत्र पाठवून पैसे वसूल करते. एकदा पैसे मिळाले की नंतर पुन्हा कधीच त्या तरुणाला भेटायचं नाही, अशी या टोळीची कार्यपद्धती होती. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीने आतापर्यंत नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोलीसह मराठवाड्यातील शेकडो तरुणांना अशाच पद्धतीने फसवले आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात अतापर्यंत 12 तरुणांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये तक्रारी दिल्या असून त्यांच्या तक्रारीप्रमाणे फसवणुकीचा आकडा 1 कोटी 30 लाख आहे. नागपूर जिल्ह्यात अनेक तक्रारी आल्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याचे तपास केले आणि शिल्पा पालपार्थी नावाच्या एका महिलेला अटक केली आहे.


 मात्र, राज्यातील अनेक पोलीस स्टेशन्समध्ये ही या टोळीविरोधात फसवणुकीच्या तक्रारी दाखल आहे. भंडारा पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात या टोळीतील कुंदनकुमार उर्फ राहुल सिंग आणि मोहम्मद दानिश जिशान आलम या बिहारमधील दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोघे कोलकात्यात रेल्वेत कर्मचारी असल्याची माहिती आहे. दरम्यान राजेंद्र तिवारी नावाचा या टोळीचा एक खास म्होरक्या सध्या फरार आहे. 


फसवणुकीच्या याच प्रकरणातील एका आरोपीने आत्महत्या केली असून काहींचा कोरोना काळात मृत्यू झाला. त्यामुळे दिवसागणिक या प्रकरणाचे पुरावे आणि साक्षीदार नष्ट होत आहेत. मात्र, राज्यातील शेकडो तरुणांची यात कोट्यवधी रुपयांनी फसवणूक झाली असल्याने पोलिसांनी राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात विखुरलेले सर्व प्रकरण एका ठिकाणी आणून त्याचा सखोल तपास करणे गरजेचं झालं आहे.