Thane Crime News : बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करताना ठाणे पोलिसांना (Thane Police) चौकशीत बनावट नोटा चलनात आणण्याचा कटाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी इन्स्टाग्रामवरील तथाकथितर रील स्टार (Reel Star) आणि बिल्डर सुरेंद्र पाटील (Surendra Patil) आणि त्याच्याकडील 40 लाखांची लूट करणाऱ्यांना अटक केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. 


बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या बांधकाम व्यवसायिक डोंबिवलीतील रील स्टार आरोपी सुरेंद्र पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत मात्र बनावट नोटांच्या अयशस्वी झालेल्या डीलिंग आणि लुटीच्या घटनेचा उलगडा झाला आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी डोंबिवलीतील वादग्रस्त रील स्टार सुरेंद्र पाटील याला अटक केली. तर पाटील याच्या तक्रारीवरून खंडणी विरोधी पथकाने लुटीच्या गुन्ह्यात स्वप्नील दशरथ जाधव, आदेश मोतीराम भोईर, सचिन बबन जाधव आणि अक्षय तुकाराम गायकवाड याना अटक केली. पाटील आणि अन्य चार आरोपींवर मानपाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. 


बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटकेतील आरोपी सुरेंद्र पाटील (50) रा.चोळेगाव डोंबवली पूर्व हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन बेकायदेशीर पिस्तुलासह आणि 7 जिवंत काडतुससह 26 नोव्हेंबर 2023 रोजी अटक केली. त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या अधिक चौकशीत आरोपी सुरेंद्र पाटील याने दिलेल्या माहितीनुसार त्याला चलनातील 40 लाखाच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट 1 कोटी 60 लाख रुपये देणार होते. सदर बनावट नोटा घेण्यासाठी आरोपी सुरेंद्र पाटील हा 40  लाखांच्या रक्कमेसह मुरबाड येथील केपी फार्म हाउसवर गेला. बनावट नोटांच्या डीलिंगमध्ये दगाबाजी होऊ नये म्हणून सोबत दोन विना परवाना पिस्तूल सोबत घेऊन गेला. दरम्यान फार्महाऊसवर बनावट नोटा देणाऱ्या लोकांची वाट पाहतानाच अचानक पाच लोक हे फार्महाऊसवर धडकले. त्यांनी पोलीस असलयाचे सांगून छापेमारी करीत 40 लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला.
 
या घडल्या प्रकाराची सोयीची माहिती लपवून आरोपी सुरेंद्र पाटील याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेने ठाणे खंडणी विरोधी पथकही चक्रावले. त्यांनी वेगाने सूत्रे हलवत 40 लाखांची लूट करणाऱ्या चार आरोपीना भिवंडीच्या परिसरातून अटक केली. आरोपींमध्ये स्वप्नील दशरथ जाधव (26) रा. आनगाव, भिवंडी, आदेश मोतीराम भोईर (35) रा. महापोली, भिवंडी, आरोपी सचिन बबन जाधव (35) रा. ता-वाडा , पालघर आणि अक्षय तुकाराम गायकवाड (30) रा. आनगाव, भिवंडी यांचा समावेश आहे. सुरेंद्र पाटील आणि बनावट नोटांचे आणि लुटीचे 4 आरोपी यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायालयाने आरोपींनी 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.