Thane Crime News: ठाणे (Thane) रेल्वे स्थानक (Railway Station) परिसरातील कॅनन हॉटेल येथे मंगळवारी (4 ऑगस्ट) पहाटे एका व्यक्तीने धारदार चॉपर हातात घेऊन प्रवेश करत मोठा धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलच्या व्यवस्थापकाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने हॉटेलमध्ये तोडफोड केली. या घटनेत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.

Continues below advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. मात्र कर्मचाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतापला. त्यानंतर त्याने हॉटेलच्या व्यवस्थापकाला फोन करून पैशांची मागणी केली आणि काही वेळातच थेट हॉटेलमध्ये दाखल झाला.

Thane Crime News: चॉपर हातात घेत हॉटेलमध्ये निर्माण केली दहशत

हॉटेलमध्ये आल्यानंतर आरोपी अधिक आक्रमक झाला. त्याने हातात धारदार चॉपर घेत हॉटेलमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले. यावेळी तो मोठ्याने ओरडत, "रिंकू कुठे आहे? त्याला कापून टाकतो, आज त्याला संपवून टाकतो," अशा शब्दांत धमक्या देत होता. आरोपीच्या या आक्रमक वर्तनामुळे हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले.

Continues below advertisement

Thane Crime News: एसी विभागासह हॉटेलची तोडफोड

यानंतर आरोपीने हॉटेलच्या एसी विभागात तोडफोड सुरू केली. हॉटेलमधील काचेचे साहित्य, फर्निचर आणि इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली. तक्रारीनुसार, या तोडफोडीत हॉटेलचे अंदाजे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Thane Crime News: गुन्हा दाखल

या घटनेत फुटलेल्या काचा खाली पडल्याने हॉटेलमध्ये उपस्थित कर्मचारी आणि ग्राहकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. फुटलेल्या काचा कोणाच्या अंगावर पडल्या असत्या तर गंभीर दुखापत किंवा जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली दिलीप आहिरे करत आहेत. दरम्यान, रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या परिसरात भर पहाटे चॉपर घेऊन हॉटेलमध्ये घुसून दहशत निर्माण केल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपीचा नेमका उद्देश काय होता, तसेच त्याने पैशांची मागणी का केली, याचा तपास पोलीस करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग