Nashik Crime : तडीपार सराईत गुंड भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (Praveen Kandalkar) (27, रा. शहा) याची गावातीलच 14 जणांच्या टोळक्याने घरात घुसून बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी 14 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वावी पोलिसांनी (Vavi Police) आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतले आहे. (Nashik Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवीण कांदळकर हा दोन वर्षांच्या तडीपारीची शिक्षा भोगून घरी आला होता. शहा गावातीलच गोराणे नामक कुटुंबीयांशी त्याचे भैरवनाथाच्या यात्रेत वाद झाले होते. तेव्हापासून दोन्ही गटात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी सौरभ गोराणे, दिनेश गोराणे, वाळीबा गोराणे, शरद गोराणे, विजय गोराणे, सचिन बागल, राहुल बागल, अतुल गोराणे, आबा गोराणे, रवींद्र गोराणे, वैभव गोराणे, दगू साप्ते (पाहुणा अस्तगावकर), गणेश सोनवणे, सर्जेराव गोराणे (सर्वजण रा. शहा ता. सिन्नर) हे हातात कोयता, कुऱ्हाडी, लोखंडी रॉड, लाकडी दांडे घेऊन त्याच्या घरात शिरले.
14 जणांकडून कांदळकरला बेदम मारहाण
या सर्वांनी कांदळकरला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला बाहेर ओढून आणत अंगणात टाकून देत पळ काढला. दरम्यान, जखमी अवस्थेत भैया कांदळकर याला त्याचे वडील आणि चुलत भावाने तातडीने वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याची आई विजया कांदळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 14 जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एमपीडीए तथा महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, 1981 अन्वये कांदळकर याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव डिसेंबर 2024 मध्ये वावी पोलिसांनी पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात काही त्रुटी काढल्याने त्याची पूर्तता वावी पोलिसांनी केली होती. त्यामुळे हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे वावी पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वीच भैया कांदळकरचा गेम झाला. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून सिन्नर, एमआयडीसी व वावी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल शहाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करत आहे.
सोळापेक्षा अधिक गुन्हे
तडीपार असतानाही भैय्या कांदळकर गावात येऊन सर्रास गुन्हे करत होता. तालुक्यात आणि शहा परिसरात त्याची प्रचंड दहशत होती. त्यामुळे पोलीस यंत्रणाही हतबल झाली होती. दोन वर्षांपूर्वी तडीपार असताना तो गावात आला होता. वावी, मुसळगाव आणि सिन्नर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शहा येथील घराभोवती सापळा रचला होता. यावेळी त्याने पोलिसांवर बंदूक रोखली होती. पोलीस कारवाईला अडथळा केला म्हणून त्याची पत्नी, वडील आणि आई यांनाही जेलची हवा खावी लागली होती. वावी पोलिसात त्याच्यावर 16 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
आणखी वाचा
