Ratnagiri Crime : रत्नागिरी (Ratnagiri) पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात (Swapnali Sawant Murder Case) नातेवाईक सीबीआय चौकशीची मागणी करण्याची शक्यता आहे. स्वप्नाली सावंत यांचे नातेवाईक लवकरच याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिणार आहेत. तसंच स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल फोन शोधण्यासाठी घराशेजारील विहीर उपसली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हत्या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉडची देखील मदत घेतली जाणार आहे.
स्वप्नाली सावंत यांना त्यांचे पती सुकांत सावंत यांनी जाळून मारल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सुकांत सावंत यांच्यासह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिन्ही आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. स्वप्नाली यांचे पती सुकांत सावंत हे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख आहेत.
काय आहे प्रकरण?
सुकांत सावंत यांनी स्वप्नाली सावंत यांचा पहिल्यांदा गळा आवळला आणि त्यानंतर पेट्रोलच्या साहाय्याने मृतदेह जाळून टाकला. या घटनेने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. स्वप्नाली सावंत या पंचायत समितीच्या माजी सभापती राहिल्या आहेत. त्यांचे पती सुकांत सावंत यांच्याशी वारंवार खटके उडत होते. अनेक वेळा सुकांत यांनी स्वप्नाली यांना मारहाण देखील केली होती. रत्नागिरी शहरात राहणाऱ्या स्वप्नाली गणपतीनिमित्त आपल्या गावी आल्या आणि त्याचवेळी सुकांत यांनी डाव साधला. या प्रकरणात स्वप्नाली यांच्या आई संगीता शिर्के यांनी पोलिसात सुकांत सावंत यांचे विरोधात तक्रार दिली आणि त्यानंतर सुकांत सावंत यांच्यासह रुपेश उर्फ छोट्या सावंत आणि प्रमोद गावनांग यांना पोलिसांनी अटक केली. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत असून 19 सप्टेंबर रोजी तिन्ही आरोपींना जिल्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे.
पतीनेच दिली होती हरवल्याची तक्रार
विशेष म्हणजे पती सुकांत सावंत यांनीच स्वप्नाली सावंत या बेपत्ता असल्याची तक्रार 2 सप्टेंबर रोजी दिली होती. पण स्वप्नाली यांचा मोबाईल फोन सुकांत सावंत यांनी मोबाईल विहिरीत फेकल्याचं तपासात समोर आलं. शिवाय पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती सुकांत सावंत यांच्यावरील संशय बळावला. अशावेळी स्वप्नाली यांच्या आईने देखील सुकांत सावंत यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी देखील अत्यंत तत्परतेने तपास केला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असताना सुकांत सावंत यांच्याकडून पोलिसांना दिशाभूल करणारी उत्तरं देण्यात आली. पोलिसांनी डॉग स्कॉडची देखील मदत घेतली. त्यानंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आणि स्वप्नाली सावंत यांच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर सुकांत सावंतसह अन्य दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पण स्वप्नाली सावंत यांचा जीव हा विचारपूर्वक आणि कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यात सुरु आहे. तिन्ही आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केले जाईल. त्यावेळी पोलिसांकडून नेमके कोणते पुरावे गोळा केलेले आहेत? या प्रकरणात सुकांत सावंत यांना काय शिक्षा होणार? अन्य दोन साथीदारांचा यामध्ये कसा सहभाग आहे? या प्रश्नांची देखील उत्तरे मिळणार आहेत.