Stuti Sonawane Death Case Mumbai: मुंबईत डॉक्टर स्तुती बजरंग सोनावणे (Stuti Sonawane) हिने आपल्या प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. 8 मार्च रोजी स्तुती बजरंग सोनावणेने गळफास लावून आत्महत्या (Suicide News) केली होती. मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाणे यांनी 24 वर्षीय डॉ. स्तुती बजरंग सोनावणे (Stuti Sonawane) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुजैल मोहम्मद खान (31) याला लोअर परळ (Lower Parel) येथून अटक केली आहे. 

स्तुतीने आत्महत्या करण्याआधी सहा पानांची सुसाईड नोट लिहिली होती. स्तुती सोनावणे आणि फुजैल खान यांची ओळक एका डेटिंग अ‍ॅपवरुन झाली. त्यानंतर ते गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, या दोघांमध्ये भांडणे व्हायची. त्यावेळी फजल खान तिला मारुन टाकण्याची धमकी द्यायचा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. स्तुतीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

स्तुतीने सुसाईट नोटमध्ये काय काय लिहिलं? (Stuti Sonawane Death Case Mumbai)

पहिल्या भेटीपासून ते त्यांच्या प्रेमाची सुरुवात कधी आणि कशी झाली, इथंपासून ते आयुष्याचा शेवट करण्यापर्यंत प्रकरण कसं गेलं, तो तिला काय बोलायचा, कसा वागायचा, याची सगळी माहिती स्तुतीने चिठ्ठीत लिहिलं आहे.  आपली पहिली भेट दादरला झाली होती ते मला अजूनही आठवतंय. आपण तासन्‌तास चाललो होतो आणि पिझ्झा खाताना तू मोठ्याने ओरडत हसत होतास. त्याक्षणी आपली लगेचच छान मैत्री झाली होती. माझा वाढदिवस तू ताज हॉटेलमध्ये ज्या प्रकारे साजरा केला, खोली सजवली होतीस, ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कोणी मला इतकं खास वागवेल असं मी कधी कल्पनाही केली नव्हती. आपली अलीबागचा ट्रिप, त्या बाइक राईड्स, आंबट कँडी खात घालवलेले क्षण, त्या छोट्या बाथटबमध्ये तू बसण्याचा प्रयत्न करत होतास ते खूप मजेशीर आणि गोड होतं. बॅडमिंटन खेळताना मी तुला नेहमी हरवायचे, तेही मला आठवतं. ड्रॅगनफ्लाय हायच्या गल्ल्यांमध्ये आपण फिरायचो, छोट्या कामांसाठी जायचो आणि मांजरींना कुरवाळायचो, ते क्षणही आठवतात. आपण खेळलेला तो गेमही आठवतो, ज्यात आपण दोघांनी एकाच ‘पॉइझन कँडी’ची निवड केली होती. किती योगायोग होता तो...असं स्तुतीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

तुझे शब्द इतके तीव्र होते की ते माझं आयुष्य संपवण्यासाठी पुरेसे ठरले- (Stuti Sonawane Death Case Mumbai)

तू मला खूप अपमानित केलंस. मी इतकी वाईट आहे का? तुझे शब्द इतके तीव्र होते की ते माझं आयुष्य संपवण्यासाठी पुरेसे ठरले. मी पूर्णपणे सुन्न झाले आहे. मला काहीच समजत नाही. मला आशा आहे की तू आनंदी असशील आणि तुझा नाजूक पुरुष अहंकार आता समाधानी झाला असेल. मी आयुष्यात कधी इतकी खालच्या पातळीवर वाटले नव्हते. यापेक्षा वाईट काय होऊ शकतं?सगळं असूनही मला स्वतःवर हसू येतंय, कारण मला अजूनही तुझ्यासोबत राहायचं होतं. तुझे शब्द माझ्या डोक्यात सतत घुमत आहेत. तू माझ्यावर ओरडलास. मला असं वाटलं की मी तुझ्यासमोर असते तर तू मला मारलंच असतंस किंवा खूप हिंसक झाला असतास. मला तुझी भीती वाटते. तू मला “हो” म्हणालास, तू म्हणालास की माझ्यावर खर्च केलेला वेळ आणि पैसे तुला वाया गेल्यासारखे वाटतात. खरं सांगायचं तर मला तुझ्यासोबत कधीच सुरक्षित वाटलं नाही, पण तरीही मी तुझ्यावर प्रेम केलं, असंही तिने आपल्या नोटमध्ये म्हटलं आहे.

स्तुतीचे वडील काय म्हणाले? (Stuti Sonawane Death Case Mumbai)

स्तुतीही मानसिक तणावात होती हे तिने कधी दाखवले नाही. ती हुशार होती अभ्यासू होती. त्या रात्री ती अभ्यासासाठी तिच्या खोलीत होती त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र ती ज्या गोष्टींमध्ये मानसिक तणावात होती त्याबाबत आम्हाला कधीच सांगितलं नाही. सांगितलं असतं तर आम्ही त्यातून मार्ग काढला असता. आता माध्यमातून चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवल्या जात आहेत. माझी पोलिसांकडून अपेक्षा आहे मुख्य आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी स्तुतीने वडील बजरंग सोनावणे यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय? (Stuti Sonawane Death Case Mumbai)

प्रियकर फुजैलच्या त्रासाला कंटाळून डॉ. स्तुती सोनावणे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 8 मार्च रोजी स्तुतीचे आई-वडील जेवण्यासाठी बाहेर गेले होते. हे दोघे घरी परत आल्यावर स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. त्यावेळी स्तुतीच्या वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला असता स्तुतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन स्तुती सोनावणे हिचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालानुसार डॉ. स्तुती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत. या तपासातून आता कोणती नवीन माहिती समोर येणार, हे बघावे लागेल.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai Crime News: 'रिलेशनमध्ये असूनही बंबल वापरायचा, दारूसह अनेक वाईट सवयी', मुंबईतील डॉक्टरने शेवटच्या चिठ्ठीत सांगितली काळीज चिरणारी व्यथा