Solapur Pandharpur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ऊसतोड मजुराने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे गोपाळपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे यांच्या घराशेजारी ऊसतोड मजूर ऊस तोडीसाठी वस्ती करून राहिले होते. याठिकाणीच ही घटना घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ऊसतोड मजूर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातले
एका बाजूला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू असताना पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे एका ऊसतोड मजुराने आपल्या पत्नीची कोयत्याच्या सहाय्याने निर्घुण हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच केवळ दोन तासात आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे. गोपाळपूर येथील शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांच्या घराशेजारी ऊसतोड मजूर ऊस तोडीसाठी वस्ती करून राहिले होते. आज पहाटे एका महिलेवर हल्ला होऊन ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन या जखमी महिलेला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. हे ऊसतोड मजूर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातले असून यातील लक्ष्मी भानुदास वाघ या 35 वर्षीय महिलेचा खून तिचा पती भानुदास वाघ यांनी केल्याचा पोलिसांना संशय होता.
पतीने नेमकी पत्नीची का हत्या केली याचे कारण समोर आलेले नाही
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिसरात शोध सुरू केला असता आरोपी पती भानुदास वाघ हा पोलिसांना सापडला. या हत्या झालेल्या पत्नीला दोन लहान मुले आहेत. दरम्यान, या पतीने नेमकी पत्नीची का हत्या केली याचे कारण समोर आलेले नाही.
ठाण्यातील नौपाडा पोलिस स्थानक हद्दीत एका 26 वर्षीय तरुणाचा खून
ठाण्यातील नौपाडा पोलिस स्थानक हद्दीत एका 26 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहन मोरे असे 26 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. ठाण्यातील गावदेवी मैदानात क्रिकेट खेळण्याच्या वादातून हा खून झाला आहे. यामध्ये एक जण गंभीरित्या जखमी असून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संध्याकाळी साडेचार वाडण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. गावदेवी मैदानामध्ये पोलिसांची टीम तैनात करण्यात आली आहे. पंचनामा करुन पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.