Solapur Crime news: माळशिरस तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे विभागाने मोठी सापळा कारवाई केली आहे. अकलूज (Akluj news) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि नंतर अटकपूर्व जामीन व कलमे न लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) यांच्या नावाने तब्बल 25 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दोन खाजगी दलालांना 5 लाख 50 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता माळशिरस येथे पालखी महामार्गावरील ब्रिजखाली, जानकर प्लॉट शेजारी ही कारवाई करण्यात आली. (Solapur news)
या प्रकरणातील तक्रारदार (पुरुष, वय 37, व्यवसाय- लायसन्स कन्सल्टंट) यांनी 21 ऑगस्ट रोजी याबाबत तक्रार दिली होती . त्यानुसार त्यांचे भाऊ व इतरांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी अकलूज उपविभागीय कार्यालयात असणारा पोलीस हवालदार अनिल शिंदे याने स्वतःसाठी व उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्यासाठी 25 लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने नकार दिल्यानंतर त्यांच्या भाऊ व इतरांविरुद्ध अकलूज पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. 564/26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हवालदार अनिल शिंदे यांनी खाजगी इसम आबा वळकुंदे याच्या मोबाईलवरून तक्रारदाराशी संपर्क साधून "तुम्ही जर अगोदर 25 लाख दिले असते तर गुन्हा दाखल झाला नसता" असे सांगून त्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आणि PC & PNDT चे कलम न लावण्यासाठी तपास अधिकारी डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी 25 लाख व काम झाल्यानंतर स्वतःसाठी 5 लाख अशी मागणी करून 10 लाख रुपये स्वीकारल्याची तक्रार ACB पुणे येथे देण्यात आली. लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीत खाजगी इसम आबा वळकुंदे याने 25 लाखांची मागणी केल्याचे व 10 लाख स्वीकारल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आबा वळकुंदे व महादेव माने यांनी तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी व BNSS 35 (3) अन्वये नोटीस देण्याचे सांगतो असे सांगून तपास अधिकारी डीवायएसपी वाळके यांच्यासाठी 5 लाख व पोलीस राहुल वाघ यांच्यासाठी 50 हजार अशा एकूण 5,50,000 रुपयांची मागणी केली
त्यानुसार पुणे युनिटने सापळा रचून खाजगी इसम आबा सावळा वळकुंदे (वय 48, रा. वळकुंदे मळा, 61 फाटा, ता. माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय 39, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) यांना तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देण्यासाठी लोकसेवक राहुल वाघ यांच्याकरिता 5,50,000 रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ, 12 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी नं. 1 व 2 यांना 29/08/2026 रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.
या गुन्ह्यात एकूण खालील 4 आरोपी आहेत 1) आबा वळकुंदे (खाजगी दलाल)2) महादेव माने (खाजगी दलाल)3) अनिल महादेव शिंदे (पोलीस हवालदार, उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज)4) राहुल मारुती वाघ (पोलीस हवालदार, माळशिरस पोलीस स्टेशन)
आणखी वाचा
