Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड... या घटनेनं संपूर्ण देश हादरलाय. दिवसागणिक या घटनेत अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत. पोलीसही कसून तपास करत आहेत. अशातच आता या घटनेतील आरोपी आफताब पूनावालाचा पहिला जबाब समोर आला आहे. पालघर पोलिसांत 12 ऑक्टोबर 2022 रोजी माणिकपूर पोलीस स्थानकात श्रद्धा वालकर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आफताबसोबत दिल्लीत लिव्ह-इनमध्ये राहण्यास सुरुवात केल्यानंतर श्रद्धाचे तिच्या घरच्यांसोबत संबंध बिघडले होते. पण तिच्या मित्रांच्या ती नियमितपणे संपर्कात होती. पण काही दिवसांपासून त्यांनाही श्रद्धाचा फोन आला नाही. त्यामुळे मित्रांचा संशय बळावला. त्यांनी श्रद्धाच्या वडिलांना भेटून यासंदर्भात माहिती दिली. श्रद्धाच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 


26 ऑक्टोबर रोजी वसई पोलिसांनी सर्वात आधी आफताबचा जबाब नोंदवला होता. त्यावेळी नोंदवलेला आफताबचा जबाब एबीपी माझाच्या हाती लागला आहे. पाहुयात त्यामध्ये आफताबनं काय सांगितलं होतं...? 


आफताबनं वसई पोलिसांना दिलेल्या पहिल्या जबाबात म्हटलं होतं की, "मी, आफताब अमीन पूनावाला, वय 28 वर्ष, पत्ता : 301, C विंग , यूनिक पार्क सोसायटी , वसई वेस्ट पालघर येथे राहतो. या पत्त्यावर मी 2004 पासून 2019 पर्यंत माझे आई, वडील आणि लहान भावासोबत राहत होतो. गेल्या 6 महिन्यांपासून मी दिल्लीमध्ये राहतोय. हरियाणातील गुडगावमझ्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये असिस्टंट प्रोडक्ट कन्सल्टंट म्हणून मी काम करतोय. तसेच, सोशल मीडियावर फूज ब्लॉगिंगही करतोय."


"मे 2019 मध्ये मी श्रद्धा विकास वालकर हिच्या संपर्कात आलो. आम्ही दोघं बम्बल नावाच्या डेटिंग साईटवर भेटलो आणि एकमेकांच्या संपर्कात आलो. श्रद्धा मुंबईच्या मालाड परिसरात डिकॅथलॉनच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. कामावरुन घरी परतताना मी तिला भेटायचो आणि रात्री उशिरा तिला तिच्या वसईतील संस्कृती अपार्टमेंटत्या खाली सोडायचो.", असं आफताबनं जबाबत सांगितलं आहे.  


पोलिसांना जबाब देताना आफताब म्हणाला होता की, "ऑक्टोबर 2019 मध्ये आम्ही दोघांनी एकत्र लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, आमच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हतं, त्यांचा विरोध होता. कुटुंबीयांचा विरोध असतानाही आम्ही दोघांनी ऑक्टोबर 2019 मध्ये लिव्ह इनमध्ये राहण्यास सुरुवात केली. आम्ही नायगाव येथील किनी कॉम्प्लेक्समध्ये यशवंत प्राईज बिल्डिंगमध्ये भाड्याच्या घरात राहू लागलो. इथे वर्षभर आम्ही राहिलो. यादरम्यान, श्रद्धा आणि मी, दोघंही मालाडमधील एका कॉलसेंटरमध्ये कामाला लागलो. त्यावेळी आमची लहान-सहान कारणांवरुन भांडणं होऊ लागली."


जानेवारी 2020 मध्ये श्रद्धाची आई हर्षला वालकर यांचं निधन झालं. त्यावेळी 15 दिवसांसाठी श्रद्धा तिच्या घरी संस्कृती अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी गेली होती. 15 दिवसांनी ती पुन्हा आफताबसोबत त्याच्या घरी नायगावमध्ये राहण्यासाठी परतली. श्रद्धाच्या आईच्या निधनानंतर दोघांमध्ये खूप वाद होऊ लागल्याचंही आफताबनं पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर नायगाव येथील किनी सोसायटीमध्ये श्रद्धा आणि आफताब दोघं वर्षभर राहत होते. भाड्याच्या घराचं अॅग्रीमेंट संपल्यानंतर ते दोघं वसईतील विजय विहार कॉम्प्लेक्स रीगल अपार्टमेंटमध्ये घर भाड्यानं घेतलं आणि तिथे राहू लागलो. आतापर्यंत श्रद्धा खूप चिडचिड करायला लागली होती. यादरम्यान, श्रद्धानं तिचे लहानपणीचे मित्र लक्ष्मण नाडर आणि सुबिन यांच्याशी आफताबची ओळख करुन दिली. लक्ष्मण आणि सुबिन नेहमीच दोघांकडे पार्टी करण्यासाठी यायचे, असंही आफताबनं जबाब नोंदवताना म्हटलं होतं. 


जुलै 2021 मध्ये एक दिवशी आफताब आणि श्रद्धामध्ये वाद झाला. श्रद्धानं लक्ष्मण आणि सुबिन यांना फोन करुन घरी बोलावलं. लक्ष्मण आणि सुबिन, श्रद्धाला आपल्यासोबत घेऊन गेले. काही दिवसांनी श्रद्धा पुन्हा आफताबसोबत राहायला आली. त्यानंतर आम्ही वसईतील व्हाईट हिल्स सोसायटीत विद्या विकास शाइनमध्ये भाड्यानं घर घेतलं आणि तिथे राहू लागलो, असं आफताबनं म्हटलं होतं. 


श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबनं पोलिसांना जबाब देताना माहिती दिली की, "माझ्यात आणि श्रद्धामध्ये नेहमीच वाह व्हायचे. याच वर्षी मार्च 2022 मध्ये आम्ही आमच्यातील वाद मिटवण्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवण्याचं ठरवलं. त्यानंतर आम्ही लॉन्ग हॉलिडे प्लान करण्याचा निर्णय घेतला. मार्च महिन्यात आम्ही उत्तर भारतात फिरण्यासाठी गेलो. आम्ही हिमाचलमध्ये बर्बलिंग, कसोल, मनालीमध्ये फिरलो. उत्तराखंडमझ्ये हरिद्वार, देहरादून, मसूरी यांसारख्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलो. जवळपास 15 ते 20 दिवसांच्या पिकनिक दरम्यानही आमच्यात भांडणं झाली. या पिकनिकमध्ये आम्हाला बद्री नावाचा एक मुलगा भेटला. त्याच्याशी आमची मैत्री झाली. त्यानेच मला आणि श्रद्धाला दिल्लीत भाड्यानं घर मिळवून देण्यास मदत केली. त्यानंतर आम्ही दोघं दिल्लीला शिफ्ट झालो. पण श्रद्धा आणि माझ्यात दररोज भांडणं होत होती. त्यानंतर श्रद्धानं वैतागून मे महिन्यात घर सोडलं आणि ती निघून गेली. मला आता माहीत नाही, श्रद्धा नेमकी कुठे आहे."


दरम्यान, आफताबचा सर्वात आधी जबाब 26 ऑक्टोबर रोजी वसई पोलिसांनी सर्वात आधी आफताबचा जबाब नोंदवला होता. त्यावेळी आफताबनं श्रद्धा सध्या कुठे आहे, यासंदर्भात त्याला काहीच माहीत नसल्याचं सांगितलं होतं.