Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा (Shraddha Murder Case) तपास करणारे दिल्ली पोलीस (Delhi Police) वसईत (Vasai) दाखल झाले आहेत. वसईमध्ये दिल्ली पोलिसांनी आफताब आणि श्रद्धा यांचे शेजारी, मित्रपरिवाराची चौकशी केली आहे. त्याशिवाय डेटिंग अॅपवरून आफताबला भेटलेल्या तीन तरुणींची चौकशी दिल्ली पोलिसांनी केली. वसईतील माणिकपूर पोलीस (Vasai Manikpur Police Station) ठाण्यात मंगळवारी ही चौकशी करण्यात आली. श्रद्धासोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपच्या नात्यापूर्वी आफताबचे याआधीदेखील प्रेमप्रकरणे होती अशी माहिती समोर आली होती.
दिल्ली आणि वसई पोलिसांनी या चौकशीबाबत कोणतीही माहिती उघड केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीन तरुणी आफताबला पूनावाला याला डेट करणाऱ्या तरुणी असू शकतात. याआधी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आफताब पूनावाला डेट करत असलेल्या चार पैकी दोन तरुणींचा शोध वसई पोलिसांकडून सुरू होता.
दिल्ली पोलिसांमधील सूत्रांनी 'मिडे-डे' या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी चौकशी करण्यात आलेल्या तरुणी या हत्येच्या आधी आणि नंतरही आफताबच्या संपर्कात होत्या. त्याशिवाय त्यांच्यात फोनवरून संभाषणदेखील झाले असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी तपास करताना या तरुणींची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. दिल्ली पोलिसांनी आफताब पूनावाला याच्या एका मित्राचीदेखील चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा मित्रदेखील आफताबच्या संपर्कात होता. मात्र, पोलिसांना त्याने समाधानकारक उत्तर दिले नसून आपण फक्त आफताबसोबत फोनवर गप्पा मारत होतो, असे त्याने म्हटले.
पोलिसांकडून श्रद्धाचे मित्र-मैत्रिणी, कार्यालयातले सहकारी, नातेवाईक असे अंदाजे 20 हून अधिक लोकांचे जबाब घेतले गेले आहेत. बहुतेक जणांनी त्यांच्या श्रद्धासोबत केलेले चॅट किंवा कॉलबाबतची माहिती आणि पुरावे पोलिसांना दिले आहेत. तर, दुसरीकडे पोलिसांकडून आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, आफताब पूनावाला तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्याने दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुरावे जमा करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती आहे. कोर्टात हे पुरावे अधिक मदतशीर कसे ठरतील यासाठी पोलिसांकडून चाचपणी सुरू आहे. श्रद्धाच्या हत्येबाबत माहिती गोळा करत असताना पोलिसांना मृतदेहाचे अवशेष गोळा करणे कठीण जात आहे. शिवाय आफताब देखील वारंवार आपले जबाब बदलत आहे. त्यामुळे पोलिसांना पुरावे गोळा करण्यात आणि तपास करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: