Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
Ramesh Mhatre Case : डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रेसह चौघां आरोपींना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Ramesh Mhatre Case ठाणे :शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण (Dombivli News) केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. अशातच या प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रेसह चौघां आरोपींना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांनी या संदर्भात निकाल दिला आहे.
दरम्यान, जामीन झाल्यावर महाराष्ट्राबाहेर राहण्याचे रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांना आदेश देण्यात आले आहे. रमेश म्हात्रे यांच्यासहित सर्व आरोपींनाही जामिन मंजूर झाला आहे. तर आठवड्यातून तीन वेळा राहतील तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे देखील निर्देश . मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. सोबतच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचे न्यायालयाने सांगितलंय. तर रमेश म्हात्रे आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोव्यात राहणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांची उच्च न्यायालयाला दिली आहे.
High Court : आठवड्यातून तीन दिवस स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावणं बंधनकारक
मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्यातून तीन दिवस स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावणं रमेश म्हात्रेला बंधनकारक असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. तर गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमेश म्हात्रेंचा मुक्काम असणार, अशी माहिती त्यांच्या वकिलांमार्फत उच्च न्यायालयाला दिली आहे. हा खटला लवकरात लवकरात चालवून संपवण्याच्याही दंडाधिकारी न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. आरोपपत्र दाखल करताच 7 दिवसात खटला सुरू करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तर अजून तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवणे बाकी असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. यावर मंगळवारपर्यंत जबाब नोंदवून पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.
High Court : रमेश म्हात्रेसह सर्व आरोपीना कोर्टाकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश
दरम्यान, रमेश म्हात्रेसह सर्व आरोपींना कोर्टाकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला सुरू असताना आरोपींच्या वकिलांकडून एकही दिवस सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी होता कामा नये, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने ठणकावलं आहे. आरोपी रमेश म्हात्रे आणि इतरांना कोर्टात व्हिसीद्वारे हजर राहण्याची परवानगी द्या, अशी मागणी वकिलांनी कोर्टात केली असता "ही व्हीआयपी ट्रिटमेंट नाहीये का?" असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. मात्र, आरोपी कोर्टात पोहोचू शकत नसेल तर तसा रीतसर अर्ज कोर्टाकडे करून एखाद्या वेळेस व्हिसीद्वारे हजर राहण्यास उच्च न्यायालयाची परवानगी दिली आहे.





















