Shahapur School : मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र केलं, मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर POCSO गुन्हा दाखल
Shahapur English School Controversy : शहापूरमधील या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी मुख्याध्यापिकेला अटक केली असून तिच्यासह इतर आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे : एका इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्यध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच शिक्षिका, दोन महिला कर्मचारी, एक शिपायाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर शहरातील आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये 300 च्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत. 8 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 च्या सुमारास मुख्यध्यापिकांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले. त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरुमच्या लादीवरील रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवले.
मुलींच्या हाताचे ठसेही घेतले
मासिक पाळी आली आहे किंवा नाही याबाबत विचारणा त्यांनी विद्यार्थिनींकडे केली. त्यानंतर ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास 5 शिक्षिकाना सांगितले. तसेच ज्या मुली त्यांना मासिक पाळी आली नाही असं सांगतात त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचे आदेश महिला कर्मचाऱ्यांना दिले.
पालकांनी गोंधळ घातला
या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी आज ( 9 जुलै रोजी ) शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकराचा जाब विचारत गोंधळ घातला. दुसरीकडे इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप केला.
बुधवारी पालक आणि शालेय प्रशासन यांच्यात मोठा वाद झाला. दमाणी स्कूलमधील मुख्यध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतला.
मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल आणि अटक
या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी पीडित मुलींचे पालक थेट पोलिस ठाण्याच्या आवारात एकत्र आले. अखेर पोलिसांनी शहापूर पोलीस ठाण्यात भा.न्या. संहिता कलम 74, 76 सह कलम 11, 12, 29 पोक्सो अन्वये मुख्यध्यापिकेसह 5 शिक्षिका व शाळा प्रशासन व्यस्थापन समितीत असलेल्या दोन महिला अशा आठ जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापिकेला कामावरून कमी करण्यात आल्याचं शाळा प्रशासनाने म्हटलं आहे.
ही बातमी वाचा :























