Saptashrungi Devi Temple:महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या (Saptashrungi Devi Temple) कारभारातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये सुमारे 22 किलोची तफावत आढळली असून, या 'चांदी अपहार' प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Continues below advertisement

Saptashrungi Devi Temple: नेमकं प्रकरण काय?

सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रार केली होती. जुन्या नोंदींनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठी 406 किलो चांदी वापरण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष मोजणी केली असता केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे आढळले. अशा प्रकारे सुमारे 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचे उघड झाले आहे.

Saptashrungi Devi Temple: प्रशासनाची कडक पावले

25 मार्च 2026 रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तसेच विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपवले आहे. अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी यासंदर्भात लेखी आदेश काढले आहेत. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Continues below advertisement

Saptashrungi Devi Temple: नियम धाब्यावर बसवल्याचा संशय

ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी चौकशी समितीसमोर दिलेल्या खुलाशात धक्कादायक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, चांदी काढताना पंचनामा करणे, तिचे अधिकृत वजन करणे आणि सीलबंद करण्याची प्रक्रिया नियमांनुसार पार पडली नाही. यामुळे हा केवळ तांत्रिक घोळ नसून नियोजित अपहार असल्याचा संशय बळावला आहे.

Saptashrungi Devi Temple: आंदोलनानंतर प्रकरणाला वाचा

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव, माजी सरपंच बेबीबाई जाधव यांनी विधीज्ञ सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी 2026 पासून याविरोधात आंदोलन छेडले होते. वारंवार पाठपुरावा करूनही सुरुवातीला दाद मिळत नव्हती, मात्र राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे तक्रार गेल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली आहे.

Saptashrungi Devi Temple: फौजदारी कारवाईची मागणी

या प्रकरणात ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच अपहार केलेल्या चांदीची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी भाविकांमध्ये संतापाची लाट असून, चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime News: माझ्या अंगात दैवी शक्ती, माझं कोणी वाकडं करू शकणार नाही, रुद्राक्षाची भीती दाखवून भोंदूबाबाने महिलेसोबत नको ते केलं; अशोक खरातनंतर 'महेशगिरी'चं भयानक कांड