बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्याच्या बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) गँगच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे बीडचा आका म्हणून कुख्यात झालेल्या वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा रंगली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, सुदर्शन घुले , जयराम चाटे आणि  महेश  केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचे समजते. सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्याप्रकरणात आपला सहभाग असल्याचे नाकारत होता. मात्र, पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडीओ दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलायला लागला. सुदर्शन घुले याने, 'होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला', अशी कबुली पोलिसांना दिली. 

आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनता होता. तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे याच्यासोबत बैठक झाल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली. तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडीओ शुट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे आता या सगळ्यांचा आका असलेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचे दिसत आहे.

उज्ज्वल निकम यांनी मांडला गेमचेंजर पुरावा

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदा युक्तिवाद केला. यावेळी उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याला तीनवेळा फोन केले होते. याचा सीडीआर रिपोर्ट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर मांडला. पोलिसांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केलेला सीडीआर रिपोर्ट याप्रकरणातील गेमचेंजर पुरावा मानला जात आहे. 

आणखी वाचा

Santosh Deshmukh Case & Walmik Karad: पहिल्याच सुनावणीत उज्ज्वल निकमांनी आतापर्यंत समोर न आलेला गेमचेंजर पुरावा मांडला, वाल्मिक कराडचं कनेक्शन उघडं पाडलं