Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याने सीआयडीला दिलेल्या जबाब समोर आला आहे. कबुली जबाबामध्ये वाल्मिक कराडसाठी काम करणाऱ्या सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आता तोंड उघडलं आहे. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुदर्शन घुलेने हत्यारे कशी तयार केलीत ते अपहरणापासून संतोष देशमुखांची हत्या कशी केली याबाबत सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या झाली हे जवळपास निश्चित झालं आहे. सुदर्शन घुलेने सीआयडीला दिलेल्या जबाबात सांगितले की, 9 डिसेंबर 2024 रोजी प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटेसह मी (सुदर्शन घुले) एकत्र आलो आणि संतोष देशमुखांच्या अपहरणाचा प्लॅन रचला.
कारची काच फोडून संतोष देशमुखांना बाहेर काढले-
कृष्णा आंधळेने एक कार भाड्याने आणली होती. तसेच सुदर्शन घुलेकडे आधीपासून एक काळी जीप होती. संतोष देशमुख आणि त्यांचा मावसभाऊ कारमधून येत असल्याचे आम्हाला दिसताच एक मागे आणि दुसरी पुढे अशा दोन्ही गाड्या लावून त्यांना आम्ही रस्त्यावर अडविले. त्यानंतर दगडाने काच फोडून संतोष देशमुखांना कारमधून बाहेर काढले. संतोष देशमुखांच्यासोबत असणाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून उमरी टोलनाक्यावरुन संतोष देशमुखांचे अपहरण केले, असं सुदर्शन घुलेने सांगितले.
टाकळी शिवारात नेऊन संतोष देशमुखांना मारहाण-
अपहरण केल्यानंतर टाकळी शिवारात नेऊन संतोष देशमुखांना मारहाण केली. यात संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्याचं सुदर्शन घुलेने जबाबात म्हटलं आहे. खंडणी न दिल्यानेच वाल्मीक कराड याने आडवा येणाऱ्याला आडवा करा असा निरोप दिला होता. त्याप्रमाणेच आम्ही सरपंच संतोष देशमुखांना मारहाण केली. याचवेळी विष्णू चाटे याला जयराम चाटेच्या फोनवरून दोन वेळेला बोलणं झाल्याची कबुली सुदर्शन घुलेने दिली आहे.
वाल्मिक कराडच्या तुरुंगातून आणखी 3 कैद्यांना हलवलं
बीड जिल्हा कारागृहात 31 मार्च रोजी सकाळी कराड गँग आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचे समोर आलं होतं. महादवे गित्तेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची आलं. महादेव गित्तेला पोलिस व्हॅनमधून नेत असताना त्याने ही माहिती दिली. मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते यासह इतर चौघांना संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले होते. दरम्यान, आज अक्षय आठवले यांच्यासह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आले.