Siddhant Shirsat relation with Woman: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे मराठवाड्यातील ताकदवान नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट (Siddhant Shirsat) यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांत शिरसाट यांनी आपल्याला धमकावून आणि बळजबरीने आपल्याशी शारीरिक संबंध (Physical Relations) प्रस्थापित केले. सिद्धांत शिरसाट यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप या महिलेने केला आहे.
या महिलेने केलेल्या आरोपांनुसार, सोशल मीडियावरुन 2018 साली सिद्धांत शिरसाट आणि या महिलेची ओळख झाली होती. काही काळाने या दोघांचे मैत्रीचे संबंध आणखी घट्ट झाले. हे दोघेही मुंबई उपनगरातील चेंबूर परिसरातील एका फ्लॅटवर भेटायचे. चेंबूरच्या या फ्लॅटवर सिद्धांत शिरसाट आणि महिलेमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. या शरीरसंबंधांमुळे महिलेला दिवसही गेले होते. मात्र, सिद्धांत शिरसाट यांनी या महिलेला गर्भपात करायला लावला, असे महिलेच्या तक्रारीत म्हटले आहे.
ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावत, सिद्धांत यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी , हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे. सिद्धांत यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. माझ्याशी लग्न कर. नाहीतर मी आत्महत्या करेन, अशा धोशा सिद्धांत शिरसाट यांनी महिलेच्यामागे लावला होता. सिद्धांत शिरसाट यांच्या भावनिक ब्लॅकमेलिंगमुळे या महिलेने आपल्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला आणि सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून लग्न केल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
Siddhant Shirsat Marriage: सिद्धांत शिरसाटांनी महिलेशी बौद्ध पद्धतीने विवाह केला
सिद्धांत शिरसाट आणि या महिलेचे 14 जानेवारी 2022 रोजी दोघांचे बौद्ध पद्धतीने लग्नही झाले होते. त्याचे पुरावे संबंधित महिलेकडे असल्याचे तिने म्हटले आहे. सिद्धांत शिरसाट यांच्याशी शरीरसंबंधातून संबंधित महिला गर्भवती झाली होती. मात्र, सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही या नोटीसमध्ये आहे.
लग्नानंतर सिद्धांत यांच्या वागणुकीत बदल झाला. त्यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. त्यांचे आधीचे विवाह संबंध, तसेच इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. “जर तू पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करीन” अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्याचे महिलेने म्हटले आहे.
Sanjay Shirsat News: संजय शिरसाटांच्या दबावामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही, महिलेच्या वकिलांचा आरोप
20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. मात्र, सिद्धांत यांचे वडील संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलीस कार्यवाही न करता प्रकरण दाबल्याचा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. महिलेच्या वकिलांनी सात दिवसांच्या आत सिद्धांत शिरसाट यांनी तिला नांदविण्यासाठी घरी घेऊन यावे आणि न्याय द्यावा, अन्यथा महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सूचित केले आहे. ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. संजय शिरसाट हे कॅबिनेट आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यामुळे त्यांनी पोलीसावर दबाव टाकल्यामुळे कारवाई होऊन दिली नाही, असा आरोप महिलेच्या वकिलांनी केला आहे.
आणखी वाचा