मुंबई : अभिनेता सैफ अली खानच्या (Saif ali khan) घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीसह मुंबई हादरुन गेली आहे. मुंबईत आता बॉलिवूड कलाकारही सुरक्षित नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. काही दिवसांपूर्वी याच भागात माजी मंत्र्‍यांचा खून करण्यात आला होता, तर अभिनेता सलमान खानलाही सातत्याने जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे, सैफ अली खानवर झालेला हल्ला मुंबई पोलिसांनी (Police) व गृह विभागाने गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे. सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) सैफवर शस्त्रक्रिया पार पडली. यासंदर्भत लिलावती रुग्णालयातील डॉ. निरज उत्तमानी आणि  न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यानुसार,अभिनेत्याची प्रकृती स्थीर आहे.  


एरियामा फिलिप्स उर्फ लिमा यांच्या तक्रारीच्या आधारावर वांद्रे पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर ट्रेस पासिंग, चोरीसह जिवे मारण्याचा प्रयत्न यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सैफच्या घरात शिरला तेव्हा काही शोधण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी लिमा यांनी आरोपीला हटकले, त्यावेळी त्याने अगोदर तिच्यावरच हल्ला चढवला होता. त्यातून लिमाने आवाज दिल्याने आरडा ओरड एकूण सैफ मदतीला धावला. सैफ आणि घरात घुसलेल्या व्यक्तीमध्ये हाणामारी झाली, त्यात प्रतिकार करताना आरोपीने सैफ अली खानवर हल्ला चढवल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


एरियामा फिलिप्स उर्फ लिमा ही तैमुरचा सांभाळ करण्याचं काम सैफ अली खानच्या घरी करते. नॅनी असल्याने तीचा घरात सर्वत्र वावर असतो, त्यातूनच रात्री चोरटा घरात शिरल्याचे सर्वप्रथम नॅनीने पाहिले होते. त्यामुळे, तिच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अभिनेता सैफ अली खान व करिना कपूरच्या बंगल्याजवळच 'पेटफ़ीना' नावाची इमारत असून या इमारतीच्या कंपाऊंड वॉलवरुन आरोपीने सैफच्या घरात प्रवेश केला. फॉरेन्सिक विभागाकडून या भींतीवरील मानवी हाताच्या ठसांच्या आधारे तपास केला जात आहे. 


आमदार राम कदम यांनी दिली प्रतिक्रिया


प्रतिभावान अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने एक व्यक्ती घुसला होता, त्यातूनच मारहाणाची घटना घडली, त्यात सैफ अली खान यांना गंभीर जखम झाली आहे. आरोपीचा उद्देश काय होता, ते चोरीच्या उद्देशाने आले होते की त्यांचा दुसरा उद्देश होता याचा तपास पोलिसांकडून केला जाईल. पुढील काळात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत ही पोलिसांची जबाबदारी असून पोलीस ती काळजी घेतील असे आमदार राम कदम यांनी व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे. 


हेही वाचा


मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?