Rohit Pawar On Mumbai Police Student Girl Harassment: कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ (CJP Protest) मुंबईतल्या दादरमधील आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीचा पोलिसाने विनयभंग (Dadar Police Student Girl Harrasment) केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. सदर घटनेचा व्हिडीओही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी शेअर करत संताप व्यक्त केला. या व्हिडीओमध्ये मुंबईतील एका विद्यार्थिनीच्या आंदोलनादरम्यानचा हा प्रकार असून एका तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणावर आता मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संदर्भातील व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात असल्याचं म्हणत पोलीस विभागाने आरोप फेटाळून लावले आहेत.

Continues below advertisement

सदर व्हिडीओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं. तसेच मुंबई पोलिसांनी व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या रोहित पवारांना देखील सुनावलं. एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडीओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते, असं मुंबई पोलीस म्हणाले. मुंबई पोलिसांच्या या माहितीवर आता रोहित पवारांनी देखील एक्सवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई पोलिसांच्या स्पष्टीकरणावर रोहित पवार काय म्हणाले? (Rohit Pawar On Mumbai Police Student Girl Harassment)

चांगल्याला चांगलं व वाईटाला वाईट म्हणणारा मी कार्यकर्ता आहे... पुरुष आंदोलकाला पकडताना महिला मध्ये आली असेल तर तेव्हाच पोलिसाने थांबणे अपेक्षित होते. परंतु पोलीस कर्मचाऱ्याने पाहिल्यानंतर देखील आंदोलक महिलेला अस्वस्थ वाटत असतानाही हात बाजूला केला नाही, ही वस्तुस्थिती आहे, असं रोहित पवारांनी सांगितले.

दिल्लीत असेल किंवा नागपुरात असेल, मुलींना पुरुष पोलीसांकडूनच मारहाण झाली. हे होत असतानाही मुंबईत तुम्ही आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी महिला पोलीस ठेवू शकत नव्हता का? तसेच हे पोलीस कर्मचारी साध्या वेशात का होते, याचे उत्तर जनतेला द्या. उगाच मलमपट्टी करण्यापेक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या वागण्याला पाठिशी घालण्यापेक्षा पोलिसांबद्दल आदर वाढेल अशी कारवाई संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कराल, ही अपेक्षा, असं रोहित पवार म्हणाले. 

विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप, पोलिसांकडून आले स्पष्टीकरण- (Mumbai Police Student Girl Harrasment)

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप झालेल्या व्यक्तीचे नाव दीपक बल्लाळ असे आहे. दीपक बल्लाळ हे पोलीस हवालदार म्हणून शिवाजी पार्क येथे कार्यरत आहे. आंदोलन संपल्यानंतर निळ्या रेनकोर्टमधील तरुण पुन्हा मुलांना आंदोलनासाठी उक्सवत होता असा पोलिसांनी दावा केला आहे. त्यावेळी बल्लाळ हे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असताना, त्याची सोबत असलेली तरुणी अटकाव करण्यासाठी मध्ये गेली असे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले. व्हिडीओमध्ये दीपक बल्लाळ यांनी मुलाच्या कॉलरला पकडल्यानंतर तरुणीमध्ये येऊन अटकाव करू लागल्याचा पोलिसांचा दावा केला आहे. संदर्भातील व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात आहे. संबंधित अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी अधिकारी दुसऱ्या दिशेला पाहत असताना एक महिला अचानक मध्ये आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेची पडताळणी केली असून, व्हिडीओचे अत्यंत बारकाईने परीक्षण करून वस्तुस्थितीची खात्री केली आहे, असं मुंबई पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. (Mumbai Police Student Girl Harrasment Video)

नेमकं प्रकरण काय? (Mumbai Police Student Girl Harassment Video)

कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ 23 जुलै रोजी मुंबईतल्या दादरमधील आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीचा पोलिसाने विनयभंग केल्याचं समोर आलं. सिव्हिल ड्रेसमध्ये आंदोलन सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसाने आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं होतं. आंदोलन सोडवण्यासाठी गेलेल्या या सिव्हील ड्रेसमधील पोलिसाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, धक्काबुक्की केली, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

संबंधित बातमी:

Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!