वसई : भरदिवसा सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून, मालकाचा खून  करणा-या दोघां आरोपींना मिरा भाईंदर वसई विरार पोलीसांच्या टिमने अवघ्या 48 तासात अटक केली आहे. यात दोघांना अटक करण्यात यश आलं असून, दोघांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. कोरोनामुळे झालेल्या आर्थिक चणचणीमुळे या दोघा इलेक्ट्रिशन असलेल्या युवकांनी हे कृत्य केले. यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे.


शनिवारी 21 ऑगस्ट रोजी नालासोपाऱ्यात साक्षी ज्वेलर्समध्ये भर दिवसा सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकून, ज्वेलर्स मालक किशोर जैन यांचा खून करण्यात आला होता. यामध्ये दोन किलो 200 ग्रॅम चांदी चोरटयांनी चोरुन नेली. तिजोरी उघडता आली नसल्यामुळे सोनं नेता आलं नाही. माञ यात ज्वेलर्स मालकाचा जीव गेला.  या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. आरोपींना पोलिसांची भीतीच नाही, अशी चर्चा सुरु झाली होती. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वाचावरण होतं. माञ अखेर नालासोपारा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अवघ्या 48 तासातच बेड्या ठोकल्या आहेत.  मोहमद अफजल आणि जॉन्सन बापिस्टा असं आरोपींची नावे आहेत. तर जॉन्सन हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर  जुहू आणि बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. कोरोनामुळे आर्थिक टंचाई आल्याने पैशासाठी त्यांनी हे कृत्य केल्याच कबूल केलं आहे.


पोलीसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून  20 अधिकारी, 70 पोलीस कर्मचारी असं पोलिसांच पथक नेमलं होतं. घटनास्थळावरुन आरोपींच सीसीटीव्ही फुटेज आणि तांञिक गोष्टींचा आधार घेवून अवघ्या 48 तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळ्या. दोघेही  इलेक्ट्रिशनचा व्यवसाय करत होते. कोरोनामुळे उद्भवलेली आर्थिक चणचण, त्यामुळे पैशाच्या गरजेपोठी ज्वेलर्सच दुकान लुटण्याची संकल्पना या दोघांनी आखली होती.


 आरोपींनी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यापूर्वी जवळपास एक महिना रेकी केली. बाजूच्या चहाच्या दुकानात चहा पिण्याच्या बाहण्याने येवून, ज्वेलर्सचा मालक किशोर जैन हे दुकानात एकटे कधी असतात, सुरक्षा रक्षक आहेत का? दुकानात आणखी कोण आहे का? याची रेकी केली होती.  शनिवारी 21 ऑगस्टला रिमझिम पाऊस सुरु असतानाच, जैन हे एकटे असल्याचा फायदा घेते दोघे आत शिरले.  मालक किशोर जैन यांनी प्रतिकार केल्यावर, त्याचे दोन्ही हात सेलो टेपने बांधून, त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर जवळच्या तीक्ष्ण हत्याराने वार करत त्यांचा खून केला. जैन यांची तिजोरी आरोपींना उघडता आली नाही. माञ बाहेर असलेले दोन किलो 200 किंमतीची चांदी घेवून ते पसार झाले.


  पोलिसांनी 48 तासातच या गुन्हयाचा छडा लावून, आरोपींना बेडया ठोकल्यामुळे व्यापारी वर्गाने पोलिसांचे आभार मानले आहेत. माञ असोसिएशनने व्यापा-यांच्या सुरक्षतेच्या दृष्टिने पोलीसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.