रत्नागिरी : जिल्ह्यातील गुहागर (Ratnagiri) तालुक्यातील मुंढर-ओळवणवाडी येथे आज शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 45 वर्षीय प्रमोद धोंडू कांबळे यांचा हाडांचा सांगाडा माळरानावर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांच्या (Police) पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी प्रमोद कांबळे हे बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी नोंदवली होती, पण पोलिसांना त्यांचा कुठेही शोध लागला नाही. 

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद कांबळे हे मे महिन्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी एक स्थानिक ग्रामस्थ अळंबी शोधण्यासाठी माळरानावर गेला असता त्याला मानवी हाडांचा सांगाडा दिसून आला. त्याने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा केला असता, सांगाड्याजवळ आढळलेल्या कपड्यांवरून तो सांगडा प्रमोद धोंडू कांबळे यांचाच असल्याची प्राथमिक ओळख पटली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, प्रमोद कांबळे यांना फिट्स (अपस्मार) येण्याचा त्रास होता. त्यामुळे माळरानावर असताना अचानक झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंढर-ओळवणवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Continues below advertisement

हेही वाचा

आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले