Ratnagiri Crime News: रत्नागिरी शहर परिसरात युवतीच्या खूनप्रकरणात (Ratnagiri Crime News) अटक केलेल्या दुर्वास पाटील याने आणखी दोन खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्यामुळे अवघे कोकण हादरलं आहे. हे सगळे खून दुर्वास पाटील (Durvas Patil) याच्या वडिलांच्या नावे असलेला सायली बार जवळच संबंधित असल्याचेही स्पष्ट झालं आहे. भक्तीचा खून केला त्यावेळी ती गरोदर होती. त्यामुळे तिच्या गर्भातील बाळाचाही खून झाला आहे. सिरीयल किलर ठरलेला दुर्वास व त्याचे साथीदार सध्या पोलीस कोठडीत आहेत.
एका खूनाचा तपास सुरू असताना दुर्वास पाटील या नराधमाने एक, दोन नव्हे तर तब्बल तीन खून केल्याचे समोर आले आहे. पहिला खून सीताराम वीर (50, वाटद-खंडाळा), दुसरा खून राकेश जंगम (28, वाटद,खंडाळा), तर तिसरा खून भक्ती मयेकर हिचा खून चौकशीत निष्पन्न झाले आहे. दुर्वास पाटील याला अटक केल्यानंतर तो सराईत गुन्हेगारासारखा वाढत होता त्याचवेळेला पोलिसांचा संशय बळावला व वाटद खंडाळा येथील आणखी एक बेपत्ता दाखल होती. त्याचा तपास सुरू असतानाच राकेश जंगम या बेपत्ता असलेल्या तरुणाचाही खून दुर्वास यानेच केल्याच्या समोर आल. पोलिसांनी तपासात आपले स्टाईलने चौदावे रत्न दाखवताच त्याने या सगळ्या खून प्रकरणांची माहिती देऊन पोलीस तपासात कबुली दिली आहे.
मारहाणीतून झाला पहिला खून-
दुर्वास पाटील यांनी पहिला खून केला तो सीताराम वीर (50, वाटद-खंडाळा) यांचा..सीताराम वीर हे दुर्वास पाटील याच्या सायली बारमध्ये कामाला होते. अमित सिताराम वीर, वय ३२ वर्षे याने या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मैत्रीण भक्ती मयेकर हिला अमित वीर यांचे वडील सिताराम वीर हे फोनवर बोलून त्रास देतात या रागाने दूर्वासने अन्य दोघांच्या संगनमताने हाताने व काठीने मारहाण केली व रिक्षा करून त्यांना चक्कर आली आहे असे सांगून घरी पाठवलं त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात दुर्वास दर्शन पाटील,विश्वास विजय पवार यांच्याबरोबरच रत्नागिरी कोकणनगर परिसरात राहणाऱ्या राकेश अशोक जंगम हा तिसरा आरोपी होता पण राकेश जंगम याचाही खून दुर्वास पाटील यान केला आहे.
पहिल्या खुनातील साक्षीदारालाही संपवले-
दुसरा खून केला तो राकेश जंगम (28, वाटद,खंडाळा) याचा. राकेश याला सीताराम वीर यांच्या खुनाची माहिती होती. राकेशने घरी आईला सांगितले होते. 6 जून 2024 रोजी तो “कपड्याची बॅग आणायला जातो”, असे सांगून घरातून गेला होता. पण तो कधी परतलाच नाही. आईने तो बेपत्ता असल्याची फिर्याद जयगड पोलिस ठाण्यात दिली होती. राकेश याला आपण “कोल्हापूरला जातो” असा खोटा बहाणा करून दुर्वास पाटील आणि नीलेश भिंगार्डे यांनी आंबाघाटात खून करून त्याचा मृतदेह टाकून दिला. एक वर्षभर बेपत्ता राहिल्याने गुन्हेगार दुर्वास निर्धास्त झाला होता.
गरोदर असलेल्या भक्ती हिचा तिसरा खून-
तिसरा खून केला तो भक्ती मयेकर ( 26, मिरजोळे) हिचा. यानंतर दुर्वासच्या डोक्यात भक्ती मयेकरला मारण्याचा कट सायली बारमध्येच रचला. आंबा घाट हे निर्जन स्थळ असल्याने या ठिकाणी मृतदेह टाकल्यास सापडणार नाही अशी त्याला खात्री होती. त्याप्रमाणे भक्तीचा ही बारच्या वरती असलेल्या रूममध्ये केबलने गळा आवळून खून केला. व पुरावा नष्ट करण्याचे हेतूने मृतदेह आंबाघाटात रात्रीच्या वेळी फेकून दिला. तब्बल दहा दिवसानंतर बेपत्ता असलेल्या भक्तीचा खून झाल्याचे उघड झाल. जणू काही घडलंच नाही या अविर्भावात दुर्वास पाटील फिरत होता. भक्तीच्या भावाने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि संशय निर्माण झालेल्या दुर्वास पाटील यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यानंतर या सगळ्या प्रकरणांना आता वाचा फुटली आहे. त्याच्यासोबत विश्वास पवार व निलेश भिंगार्डे यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत दुर्वासने एकामागोमाग एक खूनाची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
दुर्वासाला अनेक वाईट सवयी-
दुर्वास पाटील यांच्या आईचे लहानपणीच निधन झालं. त्यानंतर दुर्वासाला अनेक वाईट सवयी लागल्या होत्या. बारच्या माध्यमातून हातात पैसा खेळत होता. दुर्वास पाटील या एकाच नराधमाने तीन निर्दयी खून करून सिरीयल किलर ठरलेल्या दुर्वास पाटील व त्याच्या साथीदारांविरोधात विरोधात संताप व्यक्त होत आहे. दुर्वास पाटील याच्या घरातून पोलिसांनी हॉकी स्टिक व काही हत्यार ताब्यात घेतल्याचे समजते. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील करत आहेत.