Raigad Crime News: पेण (Pen) येथील उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळांनी विव्हळत असलेल्या एका गरोदर महिलेची वेळेत तपासणी न करता वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप डॉक्टरांवर करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर रुग्णाला टाके घालण्याचे काम करण्यास नकार दिल्याच्या रागातून संबंधित स्त्रीरोग तज्ज्ञाने ऑनड्युटी असणाऱ्या नर्सला छत्रीने मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डॉक्टरविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गुन्हा (Police Case) दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गौरी देवजी कडू या गरोदर महिला प्रसूतीसाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्या प्रसूतीकळांनी व्याकुळ झालेल्या असताना ऑनड्युटी नर्सने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा सोनावणे यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांशी संपर्क न झाल्याने अखेर लेखी कॉल पाठवण्यात आला. आरोपानुसार, लेखी कॉल देऊनही डॉक्टर रुग्णालयात वेळेत उपलब्ध झाले नाहीत. उलट त्यांनी रुग्णाला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात (Alibag District Hospital) हलवण्याचा सल्ला दिला.

Raigad Crime News: डॉक्टरांकडून नर्सला छत्रीने मारहाण

दरम्यानच्या काळात महिलेच्या प्रसूतीकळा प्रचंड वाढल्याने रुग्णालयातच तिची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर महिलेला टाके घालण्याची प्राथमिक वैद्यकीय जबाबदारी डॉक्टरांची असताना, डॉ. कृष्णा सोनावणे यांनी हे काम तेथे उपस्थित असलेल्या नर्सला करण्यास सांगितले. मात्र, नियम आणि जबाबदारीचे कारण देत नर्सने हे काम करण्यास नकार दिला. यावरून संतप्त झालेल्या डॉ. कृष्णा सोनावणे यांनी आपल्या हातातील छत्रीने नर्सवर हल्ला करत तिला 5 वेळा फटके मारले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

Continues below advertisement

मारहाणीचा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न पीडित नर्सने केला असता, डॉक्टरांनी पुन्हा तिला मारहाण केली. या घटनेनंतर घाबरलेल्या आणि अपमानित झालेल्या नर्सने थेट पेण पोलीस ठाणे (Pen Police Station) गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पेण पोलिसांनी आरोपी डॉक्टर कृष्णा सोनावणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Raigad Crime News: पोलिसांकडून तपास सुरु

या संपूर्ण प्रकरणाबाबत वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर अरसळे यांच्याकडूनही माहिती घेण्यात येत असून रुग्णालयातील प्रशासकीय हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शुभ्रा शिरगावकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि महिला कर्मचाऱ्यावर हात उचलणाऱ्या अशा बेजबाबदार डॉक्टरावर कडक कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO