Raigad Crime : रायगड (Raigad) जिल्ह्यात रविवारी (9 ऑक्टोबर) गुन्हेगारीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये एक घटना उरणमध्ये (Uran) तर दुसरी खालापूर टोलजवळ घडली. उरणमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला झाला ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. तर खालापूर टोलजवळ खासगी बसवर दगडफेक करण्यात आली, ज्यात बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. किरकोळ वादातून हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


उरणमध्ये तरुणाच्या मानेवर धारदार शस्त्राने हल्ला
रायगड जिल्ह्यातील उरण शहरातील बाजारपेठेत मोटारसायकलवर आलेल्या तरुणाने 22 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. तर, जखमी तरुणाला नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी (9 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास उरण शहरातील चारफाटानजीक मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात तरुणाने 22 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला केला. यावेळेस, जखमी तरुणाच्या मानेवर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तर, संशयित आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार झाला आहे. दरम्यान, जखमी तरुणाला नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, आरोपी  तरुणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून किरकोळ वादातून हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


Raigad : उरण शहरात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात



खालापूर टोलजवळ खासगी बसवर दगडफेक, प्रवासी जखमी
तर दुसरीकडे रविवारी (9 ऑक्टोबर) रात्री मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खालापूर टोलनजीक खाजगी बसवर दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर, या दगडफेकीमध्ये बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास विशाल ट्रॅव्हल्सची खाजगी बस ही मुंबईच्या दिशेने निघाली होती. याचदरम्यान ही बस खालापूर टोलजवळील फूडमॉल इथे थांबून पुढच्या मार्गाला निघाली असताना खालापूर टोलजवळ या बसवर अचानक मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यावेळी, अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तर या दगडफेकीत बसमधील प्रवासी जखमी झाले. तर, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरु केला आहे. खालापूर टोलनजीक मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. बसवर करण्यात आलेली दगडफेक ही फूडमॉल इथे झालेल्या वादातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.