भंडारा/रायगड: वाहनांची संख्या वाढल्याने रस्ते अपघाताच्या (Accident) घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देखील लोकसभेतील चर्चेत अपघाताच्या वाढत्या घटनांवर भाष्य करत खंत व्यक्त केली होती. कारण, अपघातांची मालिका संपता-संपेना झाली आहे. त्यातच, आज मुंबई-गोवा हायवेवर नागोठणा सुकेळी खिंडीत कंटेनरचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, कंटेनर चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दुसरीकडे भंडाऱ्यात चक्क रोड रोलर जाळण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तुमसर तालुक्यातील पिपरीचुन्नी ते चुल्हाड मार्गावरील रस्त्याच्या बांधकामावर असलेला रोड रोलर अज्ञातांनी पेटविला (Fire). त्यात 50 लाख रुपयांचा रोड रोलर पूर्णतः जळून खाक झाला आहे. रोड रोलड कोणी जाळला, व्यवसायिक स्पर्धेतून ही घटना घडली का याचा तपास तुमसर पोलीस घेत आहेत. 


मुंबई गोवा हायवेवर नागोठणा सुकेळी खिंडीत कंटेनर पलटी झाल्याने दुर्घटना घडली. येथील तीव्र उताराच्या वळणावर ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या मार्गावरील दुभाजकावर आदळून कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. महाड एमआयडीसीमधून पनवेल जेएनपीटीकडे जात असताना सुकेळी खिंडीत हा अपघात घडला, त्यामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. सध्या अपघात झालेल्या कंटेनरला क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरू केली आहे. सायंकाळी उशिरा ही अपघाताची घटना घडली. दरम्यान, अपघात झालेल्या कंटेनरमध्ये केमिकल असल्याने फायर ब्रिगेड व सह्याद्री वन्यजीव रेस्क्यू टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. फायर ब्रिगेड व रेस्क्यू टीमच्या मदतीने अपघात झालेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या ड्रायव्हरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी अधिकचा तपास नागोठणे पोलीस करीत आहेत.


50 लाखांचा रोडरोलर जाळून खाक


तुमसर तालुक्यातील पिपरीचुन्नी ते चुल्हाड मार्गावरील रस्त्याच्या बांधकामावर असलेला रोड रोलर अज्ञातांनी पेटविला. त्यात 50 लाख रुपयांचा रोड रोलर पूर्णतः जळून खाक झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या पिपरीचुन्नी ते चुल्हाड मार्गावर ही घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत तुमसर तालुक्यातील पिपरीचुन्नी ते चुल्हाड या मार्गाचं बांधकाम गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील पूजा कन्स्ट्रक्शन कंपनी करीत आहे. सदर रस्त्याच्या कडेला हा रोडरोलर उभा असताना तो पेटवून टाकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रवी ज्ञानचंदानी यांच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून अधिक तपास सिहोरा पोलीस करीत आहे.


हेही वाचा


Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले