पुणे : शैक्षणिक पंढरी आणि पुण्य नगरी असलेल्या पुणे (Pune) शहराला काय झालंय, येथील कायदा व सुव्यवस्थेचे सातत्याने धिंदवडे निघत आहेत. काही दिवसांपूर्वी कार अपघातामुळे पुणे चर्चेत होतं, त्यानंतर ड्रग्ज प्रकरणामुळे, पुन्हा बोगस प्रमाणपत्रामुळे तर आता कोयता गँगमुळे पुणे पोलिसांना (police) आव्हान निर्माण झालं आहे. पुणे शहरात कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली असून पुण्यात दोन तरुणांवर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने (Gang) कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. मात्र, 24 तास उलटून गेले तरीसुद्धा आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाहीत. या हल्लेखोरांनी हातावर, मनगटावर आणि पायावर कोयत्याचे सपासप वार केल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाने चंदननगर पोलिसात फिर्याद दिली केली आहे. त्यानुसार, 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे वारजेमध्ये तब्बल 30 सायकली चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. 


पुण्यात पु्न्हा कोयता गँग किंवा कोयत्याने हल्ला करणाऱ्यांची दहशत निर्माण झाली आहे. वडगाव शेरी भागातील सत्यम सेरेनिटीमध्ये मंगळवारी रात्री 11.30 वाजता दोघांवर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. फिर्यादी हे त्यांच्या चार ते पाच मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. अचानकपणे 4-5 मोटरसायकलवरुन 8 ते 10 जणं त्याठिकाणी आले आणि त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. 


"विश्व्या  कुठे आहे?" असे म्हणुन त्या टोळक्याने फिर्यादी यांना "विश्वजीत बरोबर का राहतो? जिवंत सोडणार नाही" असे म्हणुन फिर्यादीच्या अंगावर कोयता उगारला. तो घाव वाचवण्यासाठी फिर्यादी यांच्या मित्राने त्यांचा हाथ मध्ये घातला असता त्यांच्यावरही कोयत्याचे वार पडले आहेत. या हल्ल्यात फिर्यादीसह 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेला 24 तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असून देखील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. दुसरीकडे वारजे येथे तब्बल 30 सायकली चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. 


वारजेत सायकल चोरट्यांना अटक


पुण्यात "जॉयराईड" साठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 30 सायकल चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांनी वारजे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील उच्चभ्रू कर्वेनगर, कोथरूड भागातील अनेक सोसायटीमधून महागड्या किमतींच्या सायकल चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या घटनांचा तपास करताना पोलिसांनी शिवशंकर जाधव आणि अभिषेक जाधव यांना अटक केलीय. एका सोसायटीमधून सायकल चोरायची, मजा लुटून ती कुठल्याही भागात ते ती सायकल सोडून देत, त्यानंतर नवीन सायकल शोधायचे. अशा सायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.