Payal Pawar Zhambre Death Case Pune: पुण्यातील मुकुंदनगर परिसरात 29 वर्षीय विवाहित महिला आयटी इंजिनिअर पायल पवार-झांबरे (Payal Pawar Zhambre Death Case) हिच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. नामांकित झांबरे पॅलेसच्या कुटुंबातील सून असलेल्या पायलचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. या घटनेनंतर पायल हिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हुंडा, पैसे आणि सोन्याच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. संतप्त नातेवाइकांनी झांबरे पॅलेस येथे तोडफोडही केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पायलचे पती अक्षय झांबरे याला अटक केली असून सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय? (Payal Pawar Zhambre Death Case)

पुण्यातील मुकुंदनगर येथील अक्षय हाइट्स सोसायटीमधील फ्लॅटमध्ये सोमवारी, 2 नोव्हेंबर रोजी पायल अक्षय झांबरे यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, पायलनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. मात्र, पायलच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशयही नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. 

लग्नानंतर सोन्याच्या मागणीसाठी छळ केल्याचा आरोप- (Pune Payal Pawar Zhambre Death Case)

पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. पती अक्षय झांबरे, सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून पैशांसह सोन्याची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी दिवाळीच्या सुमारास माहेरून पाच ते दहा तोळे सोने आणण्याची मागणी केली जात असल्याचा आरोप पायल यांच्या नातेवाइकांनी केला आहे. यंदाही अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे पायल यांच्या माहेरच्या मंडळींनी सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. पायल यांचे कुटुंब शेतकरी असून दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी पुढच्या हंगामापर्यंत वेळ मागितला होता, तरीही त्यांचा छळ सुरूच होता. पायलच्या सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या या मागण्यांमुळे पायल यांच्यावर मानसिक दबाव निर्माण केला जात होता आणि त्यांचा छळ सुरू होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या सर्व आरोपांची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.

Continues below advertisement

पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं? (Payal Pawar Death Case)

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी (1 नोव्हेंबर) पायल यांचा सासूशी वाद झाला होता. त्यानंतर त्या घरातून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (2 नोव्हेंबर) सकाळी पायलचा शोध घेण्यास सुरुवात झाली. कुटुंबीय आणि नातेवाईक शोध घेत असताना मुकुंदनगर परिसरातील अक्षय हाइट्स सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये त्या मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती, कौटुंबिक वाद आणि छळाच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी कारवाई करत पायल यांचे पती अक्षय झांबरे याला अटक केली आहे. तसेच पती अक्षय, सासू मंगल अरविंद झांबरे, सासरे अरविंद झांबरे आणि नणंद अक्षता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवले आहेत.

संबंधित बातमी:

Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?