पुणे: पुण्यातील पौडफाटा परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये (Pune Accident) एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मनसे (MNS) पदाधिकाऱ्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. पौडफाटा परिसरात झालेल्या अपघातात एका टेम्पो चालकाने श्रीकांत अमराळे (Shrikant Amrale) आणि गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले. हा टेम्पो चालक दारुच्या नशेत होता. 


प्राथमिक माहितीनुसार, कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात  हा अपघात घडला. टेम्पो चालक आशिष पवार हा दारुच्या नशेत करिश्मा चौकातील गाड्यांना धडक देत जात होता. त्याचा टेम्पो करिश्मा चौकातील सिग्नलजवळ आला तेव्हा त्याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली अमराळे उभे होते. आशिष पवारने दारुच्या नशेत टेम्पो त्यांच्या अंगावर घातला. यामध्ये गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.   तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. त्यांनी आशिष पवारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 


नेमकं काय घडलं?


आशिष पवार या टेम्पो चालकाने करिश्मा चौकात अनेकांना उडवल्याची माहिती समोर आली आहे. या छोट्या टेम्पोने आधी करिश्मा चौकातील सिग्नलला दोन लहान मुलांना उडवले. मद्यपी टेम्पो चालक एवढ्यावरच थांबला नाही. त्याने टेम्पो तसाच पुढे नेला आणि काही गाड्यांच्या अंगावर वाहन नेले. त्यानंतर पौड फाटा येथे सावरकर उड्डाण पुलाजवळील सिग्नल तोडत दोन स्कुटींना धडक दिली. यानंतर टेम्पो चालकाने एका कारला धडक दिली.


करिश्मा चौकापासून मद्यधुंद टेम्पो चालक आशिष पवार सात ते आठ जणांना उडवत आला. त्यानंतर टेम्पो चालकाने सावरकर उड्डाण पुलाखाली तीन जणांना उडवले.  टेम्पो चालवताना देखील आशिष पवारचे डोळे मिटत होते. या घटनेनंतर जमावाने टेम्पो चालकाला खाली उतरवत मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहराच्या काही भागात मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले होते. त्यानुसार मद्यविक्री बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी दिला होता.


आणखी वाचा


छत्रपती संभाजीनगरमध्ये बस आणि मोपेडचा समोरासमोर अपघात, पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन तरण्याबांड मुलांचा मृत्यू