पुणे: पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. नराधम दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने स्वारगेट आगारात फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत असलेल्या तरुणीला गोड बोलून दुसऱ्या एका शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केले होते. या घटनेनंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. यानंतर दुसरा दिवस उजाडण्यापूर्वीच स्वारगेट आगार प्रशासनाने ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाले ती बस अज्ञातस्थळी हलवली आहे. (Pune Rape case)
स्वारगेट आगारातील ही शिवशाही बस काहीजणांकडून फोडण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणाच्या अनुषंगाने या बसमध्ये महत्त्वाचे पुरावे असू शकतात, त्यामुळे ही बस अन्यत्र ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून या शिवशाही बसच्या ठावठिकाण्याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
पोलिसांपासून वाचण्यासाठी नराधम दत्तात्रय गाडेची युक्ती
दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तो बसमधून उतरुन पळून गेला होता. तो पुण्यातील किंवा शिरुरच्या त्याच्या घरी गेला नव्हता. पोलिसांकडून दत्तात्रय गाडे याच्या भावाची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्याने दत्तात्रय गाडे घरी आला नसल्याचे सांगितले. दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी खूप काळजी घेत आहे. दत्तात्रय गाडे याच्याकडे मोबाईल फोन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गाडे याचे लोकेशन ट्रॅक करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या घटनेला 48 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना दत्तात्रय गाडे याला शोधून काढता आलेले नाही. त्यामुळे पुणे पोलिसांवर सध्या प्रचंड दबाव आहे.
कालपर्यंत दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची 8 पथके कार्यरत होती. मात्र, आता या पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी तरुणीवर अत्याचार झालेल्या शिवशाही बसची तपासणी केली. तेव्हा त्यामध्ये दत्तात्रय गाडे याच्या पायातील एक बूट मिळाला आहे. राजकीय आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन सध्या स्वारगेट एसटी आगारात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली आहे. यामधून पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असण्याची शक्यता आहे.
दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं इनाम
तरुणीवरील अत्याचाराला 48 तास उलटून गेल्यानंतरही दत्तात्रय गाडे फरार आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दत्तात्रय गाडे याला पकडण्यात यश येईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 7 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत.
आणखी वाचा
पुणे पोलिसांनी भोरमधून दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीला बोलावलं, नराधमाची खडानखडा माहिती बाहेर आली
स्वारगेट बस डेपोत तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड