पुणे : पाच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले, तीन वर्षांपूर्वी एका मुलाला जन्म ही दिला. नंतर मात्र दोघांमध्ये खटके उडाले. हे वाद इतक्या टोकापर्यंत गेले की यातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केली, मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःचं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार ही दिली. मात्र, पोलीस (Police) तपासात प्रियकराचे बिंग फुटले. पिंपरी चिंचवडमधील (Pune) ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आलीये. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली आहे. दिनेश ठोंबरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. तर जयश्री मोरे अस हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव होते. हत्येनंतर दिनेशने पोटच्या तीन वर्षीय बाळाला आळंदीत सोडून दिले अन् स्वतः पसार झाला होता. 


दिनेशचं आधी एक लग्न झालेल होतं, त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. तसंच जयश्री सुद्धा सात वर्षांपूर्वी बोहल्यावर चढली होती. मात्र, दिनेशचा त्याच्या पत्नीसोबतचा आणि जयश्रीचा तिच्या पती सोबतचा संसार टिकला नाही. अशात जयश्री आणि दिनेशच एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची घट्ट मैत्री जमली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कालांतराने दिनेश आणि जयश्री हे वाकड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले. तीन वर्षांपूर्वी दोघांनी एका मुलालाही जन्म दिला. लिव्ह इनच्या नात्याला पाच वर्षे उलटत असताना दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करायची. पैसे दिले नाही तर मी सोडून जाईन, असा तगादा लावू लागली. त्यामुळे दिनेश चांगलाच संतापला होता. वारंवार होणाऱ्या या वादातून मुक्त व्हायचं त्याने ठरवलं. अशातच 24 नोव्हेंबर रोजी भुमकर चौकाजवळ गाडीत दोघांमध्ये वाद झाले. तेंव्हा गाडीतील हातोडा घेऊन, दिनेशने जयश्रीच्या डोक्यात घाव घातला. मोठा रक्तस्त्राव होऊ लागला, पुढच्या काही क्षणात तिचा जीव गेला, दिनेशच्या हातून खून झाला. 


दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाट गाठला आणि त्या घाटात जयश्रीचा मृतदेह फेकून दिला. तिथून दिनेश पुन्हा पिंपरी- चिंचवड परतला आणि दुसऱ्या दिवशी प्रेयसी जयश्री बेपत्ता असल्याची वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तितक्यात जयश्रीचं वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर यामागे दिनेश असल्याचं निष्पन्न झालं. पुढच्या तपासात दिनेशने तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिल्याचं समोर आलं. याप्रकरणी दिनेशला वाकड पोलिसांनी अटक केली असून दिनेशचे बिंग फुटले. दिनेश आणि जयश्रीच्या या प्रेम प्रकरणाचा असा दी एंड झाला पण त्यांच्या या चुकीची शिक्षा तीन वर्षीय चिमुरड्याला भोगावी लागणार असल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा


सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत