Pune Crime : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये (Stock Market Trading) गुंतवणूक करुन ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवत उच्चशिक्षित तरुणांनी ज्येष्ठ नागरिकाला 1 कोटी 60 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime News) उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने सहा जणांना अटक केली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जेष्ठ नागरिक यांना व्हॉट्सअँप कॉलद्वारे शेअर मार्केट इन्व्हेसमेंटबाबत अनन्या गुप्ता या महिलेने संपर्क केला आणि त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये ॲड करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकाला विविध नंबर वरून संपर्क साधून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन चांगला परतावा मिळेल असे सांगून आरोपींनी वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे लाटले. ही किंमत तब्बल 1 कोटी 60 लाख रुपयांपर्यंत गेली. 

ज्येष्ठ नागरिकाची सायबर पोलीस ठाण्यात धाव

कुठलाच परतावा मिळत नसल्याने या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांना तपासादरम्यान पुण्यातील वाघोली येथील आयडीएफसी बँक खात्यात 5 लाख रुपये रक्कम चेकव्दारे विथड्रॉल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंगलदार यांनी तात्काळ बँकेत जाऊन खात्याचे खातेधारक आरोपी केतन याला ताब्यात घेतले. बँक खाते व मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक तपास केला असता, त्यात आरोपी आरोपी गोविंद सुर्यवंशी व आरोपी रोहित कंबोज, जब्बरसिंह पुरोहित यांचा सहभाग असल्याचे दिसल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. 

आरोपींना 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

यातील आरोपी सुर्यवंशी हा पुण्यातील वाघोली परिसरातील विघ्नेश्वर गल्टीस्टेट को. ऑप. बँकेचा संचालक असून या बँकेच्या टेक्निकल कागात आरोपी रोहित कंबोज काम करत असल्याने त्याचा फायदा घेतला आहे. दोघे बी.टेक, उच्च शिक्षित असून त्यांच्या डिगीव्हेंटरी वननेस, रजत सेल अशा डिजिटल मार्केटिंग नावाच्या कंपन्या आहेत. आरोपी गोविंद सुर्यवंशी व रोहित कंबोज हे दोघे क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारामध्ये सक्रिय असून त्यांनी त्याद्वारे अनेक युएसडीटी आरोपी जब्बरसिंह पुरोहित याला दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच गुन्ह्यातील बँक खाते बनवून त्याचा पुरवठा करणारा आरोपी निखिल ऊर्फ किशोर सातव यास देखील पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे. या सर्व आरोपींना 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

आणखी वाचा 

Deenanath Mangeshkar Hospital : कोणतेही डिपॉझिट घेऊ नका, दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर, सर्व खासगी रुग्णालयांना बजावली नोटीस