Pune Porsche case Vishal Agrawal: काही महिन्यांपूर्वी पुण्यात दारुच्या नशेत भरधाव गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राचे प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजले होते. हा मुलगा अल्पवयीन होता. त्याचे वडील पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक होते. दोघांना गाडीने उडवून (Porsche Car Accident) त्यांचा जीव घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) या धनिकपुत्राला अटक केली होती. त्यानंतर आपल्या मुलाच्या रक्तात मद्याचा अंश आढळू नये, यासाठी विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) याने ससून रुग्णालयात डॉक्टर आणि शिपायामार्फत रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर विशाल अग्रवाल याला या प्रकरणात आरोपी करुन त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. मात्र, महिनाभरापूर्वी न्यायालयाने विशाल अग्रवाल याची जामिनावर सुटका केली. त्यानंतर विशाल अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी जंगी पार्टी केली. या पार्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये अग्रवाल कुटुंबीयांचा मस्तवालपणा कायम असल्याचे दिसून येत आहे. (Pune Crime news)

Continues below advertisement

या व्हिडीओत विशाल अग्रवाल आणि त्याची पत्नी पार्टीमध्ये नाचताना दिसत आहेत. या दोघांच्या गळ्यात कोऱ्याकरकरीत नोटांचे हार घातल्याचे दिसत आहे. अग्रवाल कुटुंबीय "मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्तो सलाम करो" या गाण्यावर बेफाम होऊन नाचताना दिसत आहेत. विशाल अग्रवाल याच्या एका नातेवाईकाने त्याला उचलून घेतल्याचेही दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे. 

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात दोन तरुणांचा जीव गेला होता. यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला अटक केली होती. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर पुरवण्याइतप विशेष वागणूक दिली होती. तसेच या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलले होते. धनिकपुत्राचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी आपल्या ड्रायव्हरला धमकावण्यापासून ते पैसे दाबण्यापर्यंत शक्य ते सर्व प्रयत्न करुन पाहिले. मात्र, हे सर्व प्रयत्न फोल ठरले होते. यानंतर विशाल अग्रवाल फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तेव्हापासून विशाल अग्रवाल तुरुंगात होता. त्यावेळी विशाल अग्रवाल यांचा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला तुरुंगातून सोडण्यात आले होते. यानंतर आता विशाल अग्रवाल हादेखील तुरुंगातून बाहेर आला आहे. 

Continues below advertisement

आणखी वाचा

Pune Accident : अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा देणाऱ्यांविरोधात कारवाई होणार, जामीन प्रक्रियेत त्रुटी आढळल्याचा अहवाल

Pune Porsche Car Accident : 'मुलाने कार मागितली तर त्याला चालवायला दे'; विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरने कोर्टात सगळंच सांगून टाकलं!