Pune crime : नात्याला (Pune crime) काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. तंबाखूसाठी पैसे न दिल्याने मुलाने थेट आईच्या डोक्यात फावडे मारुन हत्या (murder) केली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिरोलीआळी या ठिकाणी मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अमोल खिल्लारी असं 23 वर्षीय हत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. 


तंबाखू खाण्यासाठी पैसे दे, यासाठी मुलाने आईकडे तगादा लावला होता. मात्र त्याच्या 60 वर्षीय आईने मुलाला तंबाखूसाठी पैसे देण्यास नकार दिला. यावरुन माय लेकांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेला. पैशांसाठी नकार दिल्याने मुलाला राग अनावर झाला. याच रागाच्या भरात त्याने जन्मदात्या आईवरच फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात दुर्दैवाने आईचा मृत्यू झाला. अंजनाबाई बारकु खिल्लारी असं 60 वर्षीय हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. घडलेल्या प्रकाराबाबत मुलाच्या वडिलांनी नारायण गाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल याला अनेक दिवसांपासून तंबाखू खाण्याचं व्यसन होतं. मागील अनेक दिवसांपासून तो कोणतंच काम देखील करत होता. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने घरात कोणी नसताना आईकडे तंबाखूसाठी पैशाची मागणी केली होती. त्यावेळी आईने पैसे नसल्यामुळे नकार दिला होता. यात दोघांमध्ये वादावादी झाली होती. पैसे दे नाही तर घर सोडून निघून जाईल, अशी धमकी मुलाने आईला दिली होती. त्यावेळी आईने देखील त्याला रागवायला सुरुवात केली आणि हवं तिथे जा, असं म्हटलं हे ऐकून अमोलचा राग अनावर झाला आणि त्याने आईवर फावड्याने हल्ला केला या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली मात्र घरात कोणीच मदतीला नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


हत्येचं सत्र संपेनाच?


पुणे जिल्ह्यात हत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील तळेगावात 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची हत्या झाली होती. प्रणव मांडेकर असं मृत तरुणाचे नाव होतं. हा तरुण इंद्रायणी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. प्रणवच्या हत्येमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी रात्रीच आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पडसाद काल उमटले. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जातो असं सांगून प्रणव घरातून बाहेर पडला होता. हत्येपूर्वी प्रणव मित्रांसमवेत एका कट्ट्यावर बसले होते. तेव्हा वीस जणांची टोळी त्यांच्या दिशेने आली. काहींच्या हातात कोयता असल्याचे पाहून प्रणव आणि त्याचे काही मित्र जीव वाचवण्यासाठी धावत होते. मात्र या टोळीने त्यांचा पाठलाग करुन हल्ला केला. यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला होता.