Pune Crime News: पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे (Sonali Hinge) हिच्यासह तिघा पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून तब्बल सात लाखांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप या तिघांवर आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजित बडे (Ajit Bade) (सध्या सायबर पोलीस ठाणे), पोलीस शिपाई सुदाम तायडे (Sudam Tayade) आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे या तिघांचा समावेश आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे.
Pune Crime News: नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणाचा उलगडा अत्यंत धक्कादायक पद्धतीने झाला. एका महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीची काही कागदपत्रे अडकल्याने तिने पोलिसांची मदत घेतली. मात्र, या तिघा पोलिसांनी याचाच गैरफायदा घेत विद्यार्थिनीला सोबत घेऊन प्राचार्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी विद्यार्थिनीमार्फत प्राचार्य आणि महाविद्यालयाविरोधात छळाची तक्रार देण्यास भाग पाडले.
Pune Crime News: प्राचार्यांकडून उकळले सात लाख रुपये
तक्रारीची भीती दाखवत या तिघांनी प्राचार्यांना धमकावले. ‘प्रकरण गंभीर आहे, अनेक तक्रारी आहेत. जर केस दाखल झाली तर तुमच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करू आणि महाविद्यालयाची बदनामी करू,’ अशी धमकी देत तब्बल 10 लाखांची मागणी करण्यात आली. भीतीपोटी प्राचार्यांनी 7 लाख रुपये दिले, अशी माहिती समोर आली आहे. ही रक्कम तिघांनी आपापसांत वाटून घेतल्याचाही आरोप आहे.
दरम्यान, संपूर्ण प्रकार पाहून विद्यार्थिनीला संशय आला आणि तिने धाडस दाखवत पालकांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Pune Crime News: पोलीस आयुक्त 'अॅक्शन मोड'वर
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आणि प्राथमिक तपासात दोष स्पष्ट झाल्यानंतर कडक कारवाई करत संबंधितांना निलंबित केले. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच वर्दीचा गैरवापर करून खंडणी उकळल्याने खाकीवरील विश्वासाला तडा गेला आहे. या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, पुढील चौकशीत आणखी काय उघड होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
