Pune Crime News: "तुमचे बँक खाते एका गंभीर गुन्ह्यातील पैसे स्वीकारण्यासाठी वापरण्यात आले आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना कोणत्याही क्षणी अटक (Arrest) होऊ शकते," अशी खोटी भीती दाखवून एका 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल 10 कोटी 74 लाख 65 हजार रुपये उकळणाऱ्या एका हायटेक आंतरराज्यीय टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सोशल मीडियावर 'रीलस्टार' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहन रामेश्वर जाधव (वय 26, रा. पिंपळे गुरव) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी रोहन जाधव हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) असून त्याने 'बीएससी' पर्यंत शिक्षण घेतले आहे. तो सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळवत होता. या संपूर्ण रॅकेटचा तपास करताना पोलिसांनी आतापर्यंत 5,436 बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार उघडकीस आणले असून सुमारे 1 कोटी 34 लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे.
Pune Crime News: सीबीआय अधिकारी अन् 'डिजिटल अरेस्ट'चा बनाव
मिळालेल्या माहितीनुसार, 23 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत सायबर भामट्यांनी या ज्येष्ठ नागरिकाच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावाने कॅनरा बँकेत एक बनावट खाते उघडले. त्यानंतर आरोपींनी स्वतःला 'सीबीआय अधिकारी'भासवून ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला. तुमचे खाते गुन्हेगारी व्यवहारांसाठी वापरले गेले असून 24 जणांनी या खात्याविरोधात तक्रारी केल्याचे सांगत त्यांना 'डिजिटल अरेस्ट'च्या (Digital Arrest) नावाखाली मानसिक दबावात ठेवले. अटक टाळण्यासाठी आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास भाग पाडले आणि अशा प्रकारे 10 कोटी 74 लाख 65 हजार रुपयांचा गंडा घातला.
Pune Crime News: रीलस्टारला बेड्या
तपासादरम्यान 30 जानेवारी रोजी एका बँक खात्यात 75 लाख रुपये जमा झाल्याचे आणि त्यातून इतर तीन खात्यांवर 6 लाख 50 हजार रुपये वर्ग झाल्याचे समोर आले. सायबर क्राइम पोर्टल, बँक ट्रान्सझॅक्शन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी रोहन जाधवचा माग काढला आणि पिंपळे गुरव येथून त्याला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी यापूर्वीच हर्षद सुभाष धनतोले (वय 26), समर्थ देशमुख (वय 24), अमर अत्तरगी (वय 24) आणि प्रणव करणसिंग आर्या (वय 31, रा. दिल्ली) या चौघांना अटक केली आहे. या टोळीशी संबंधित देशभरात 29 गुन्हे उघडकीस आले आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पुणे सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करत असून अशा प्रकारच्या 'डिजिटल अरेस्ट' किंवा खोट्या कॉल्सला बळी पडू नका, तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची माहिती किंवा पैसे पाठवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
