पुणे :  शांत शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात (Pune) कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यातील (Firing in Pune) प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आली आहे. पुण्यातील वानवडी भागातील बी. टी. कवडे रोडवर ही गोळीबाराची घटना घडली आहे. गोळ्या झाडण्यात आलेला सराफा व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्यांनी व्यावसायिकाकडील सोनं लुटून नेले असल्याचे सांगण्यात येत आहे. 


वडिलांसोबत दुचाकीवरील जाणाऱ्या सराफ व्यावसायिकावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. प्रतिक मदनलाल ओसवाल (वय 35) असे गोळीबारात गंभीर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रतिक ओसवाल आणि त्याचे वडील दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी  क्रोम मॉल चौकापासू बी. टी. कवडे रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी प्रतिकवर 3 गोळ्या झाडल्या. यावेळी प्रतिकच्या तोंडावर आणि मांडीत गोळी लागली आहे. यामध्ये प्रतीक गंभीर जखमी झाला आहे. जखमी प्रतिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. 


या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे. दरम्यान हा गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या कारणारून करण्यात आला हे मात्र समजू शकलेले नाही. प्रतिक आणि त्याचे वडील सोने घेऊन निघाले होते. गोळीबार करणाऱ्यांनी ते सोने घेऊन गेल्याचे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले. 


तू इथे का थांबलास? असं म्हणत टोळक्याकडून बेदम मारहाण अन् छातीत चाकू भोकसून हत्या


पुण्यात गुन्हेगारीच्या संख्येत सातत्याने (Pune Crime News) वाढ होत आहे. क्षुल्लक कारणावरुन हत्येच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. दरम्यान  पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबलेल्या तरुणाला 'तू इथे का थांबलास?' अशी विचारणा करत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर, तरुणाच्या छातीत चाकू भोकसून हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कृष्णा शेळके असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी, 5 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडलेली आहे. कृष्णा इतर दोन मित्रांसह थांबला होता. यावेळी चार आरोपी आणि कृष्णासह त्याच्या मित्रांचा वाद झाला, यातूनच कृष्णाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही वेळ महामार्गाच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला होता