Pune Crime Ayush Komkar: पुण्यातील टोळीयुद्धात काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर या 18 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder Case) याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले. 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नाना पेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर (Ayush Komkar Murder) याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकऱ्यांची ओळख पटली असून त्यांची नावे यश पाटील आणि अमित पाटोळे अशी आहेत. आयुष कोमकर शुक्रवारी रात्री क्लासवरुन घरी परतला होता. तो पार्किंगमध्ये गाडी लावत असताना यश आणि अमित या दोघांनी त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या होत्या. या दोघांनी आयुषच्या शरीरात एक-दोन नव्हे तर एकूण 9 गोळ्या झाडल्या. यानंतर यश पाटील आणि अमित पाटोळे यांनी घटनास्थळी दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला. आयुषवर गोळीबार करताना हे दोघे, 'इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच’ असे ओरडत होते.
पुणे पोलिसांनी आयुषची आई कल्याणी कोमकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन घेतला होता. पोलिसांनी तपासावेळी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज कल्याणी कोमकर यांना दाखवले. त्यावेळी आयुषवर गोळ्या झाडणारे दोघेजण यश पाटील आणि अमित पाटोळे असल्याची ओळख पटली होती. दरम्यान, पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्याप्रकरणात संपूर्ण आंदेकर कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर, शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर, तुषार निलंजय वाडेकर, स्वराज निलंजय वाडेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर, वृंदावनी निलंजय वाडेकर, शिवराज उदयकांत आंदेकर , लक्ष्मी उदयकांत आंदेकर, अमन युसूफ पठाण ऊर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे, सूजल राहुल मेरगु अशा 13 जणांचा समावेश आहे. बंडू आंदेकर हे आंदेकर टोळीचे प्रमुख आहेत. गेल्यावर्षी एक सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती, तो बंडू आंदेकरांचा मुलगा होता.
Ayush Komkar Murder Case: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार
आयुष कोमकर याची 5 सप्टेंबरला रात्री आठ वाजता हत्या करण्यात आली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे पोलिसांनी आयुष कोमकर याचा मृतदेह ससून रुग्णालयातील शवागारातच ठेवला होता. आंदेकर आणि कोमकर यांच्यातील टोळीयुद्धामुळे पुण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या काळात आयुष कोमकर याच्यावर अंत्यसंस्कार होऊन देणे पोलिसांनी टाळले होते. त्याच्या मृतदेहावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी आयुषचे वडील गणेश कोमकर यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात येणार आहे.
आणखी वाचा