Pune Crime Latest News : पुण्यात राष्ट्रवादी-भाजपातला वाद आता गुद्द्यावर आला आहे. कारण पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अप्पा जाधव यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. अप्पा जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल अप्पा जाधव यांना पुण्यातील नारायण पेठेत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली.  यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप वाद पुन्हा चिघळणार असल्याचं दिसत आहे. अप्पा जाधव आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार देण्यासाठी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. 


तक्रारदार अप्पा जाधव यांनी म्हटलं आहे की, वीस ते पंचवीस जणांनी माझ्या कार्यालयात येऊन मला मारहाण केली. त्यातील एकाला मी ओळखतो. संतोष कांबळे हा भाजपचा कार्यकर्ता असू शकतो. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी वैयक्तिक आकसापोटी हा हल्ला केला असू शकतो.  


राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप  म्हणाले की, हल्ल्यामध्ये दिसणारा संतोष कांबळे हा भाजपच्या माथाडी आघाडीचा माजी अध्यक्ष आहे. भाजपने या हल्ल्यासंदर्भात खुलासा करावा. तो भाजपचा कार्यकर्ता नाही असं भाजपने स्पष्ट केल्यास आमचे काही म्हणणे नाही. पण ते समर्थन करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा जगताप यांनी दिला आहे. 


दरम्यान पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी म्हटलं आहे की, अप्पा जाधव यांना पंधरा ते वीस जणांनी कार्यालयात नेऊन मारहाण केल्याची तक्रार आहे. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस तपास करण्यात येईल, असं माने यांनी सांगितलं.  


काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर  यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं होतं.  आंबेकर यांनी फेसबुकवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली होती. आंबेकर यांच्या विरोधात त्याआधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याच्या घटनेनं पुण्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.