पुणे : सध्या गुंतवणुकीचं आमिष दाखवून या ना त्या मार्गाने तरुणाईसह पेन्शनधारकांना गंडा घालण्याचं काम केलं जातय. वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणुकीतून जास्त नफा देण्याचं आमिष दाखवत फसवणूक केली जाते. आता, पुण्यातूनही (Pune) असाच प्रकार समोर आला असून क्रूड ऑइलमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 2 कोटी 74 लाख 94 हजार 882 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला मुंबई विमानतळावर अटक (Crime news) करण्यात आली.
साजिद अनिफ नवडेकर (वय 45) याला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. दुबईला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी आरोपीला अडवले. क्रूड ऑइलच्या आयात-निर्यातीतून मोठा नफा मिळत असल्याचे सांगून गुंतवणुकीचे आमिष दाखवल्याचा आरोप आरोपीवर आहे. दरमहा, 5 ते 10 टक्के परतावा आणि एका वर्षानंतर गुंतवलेली संपूर्ण रक्कम परत करण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते. त्या माध्यमातून अनेकांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करुन घेतो, कोट्यवधी रुपये जमा केले.
पुण्यातील NIBM रोडवरील ऑइल-रिसायकलिंग कंपनी चालवणाऱ्या व्यावसायिकाची देखील यामध्ये फसवणूक करण्यात आली. ऑगस्ट ते डिसेंबर 2023 या कालावधीत तक्रारदारासह 10 जणांनी तब्बल 4 कोटी 9 लाख 94 हजार 882 रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. त्यापैकी केवळ 1 कोटी 35 लाख रुपये परत करण्यात आले आहेत. उर्वरित 2 कोटी 74 लाख 94 हजार 882 रुपये परत न केल्याचा आरोप संबंधित तक्रारदाराने केला आहे. पैसे परत मागण्यासाठी संपर्क साधल्यानंतर आरोपींकडून फोन आणि मेसेजला प्रतिसाद देणे बंद असून या प्रकरणात गोहर उर्फ इमान अंगोलकर, फराहदिबा अंगोलकर आणि शाहिद अनिफ नवडेकर यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
