श्रीरामपूर / अहिल्यानगर: शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि गुंडांच्या दादागिरीविरोधात श्रीरामपूरकर कमालीचे आक्रमक (Ahilyanagar Shrirampur Band) झाले आहेत. गेल्या ११ दिवसांत प्राणघातक हल्ल्याच्या चार घटना उघडकीस आल्यानंतर, शनिवारी भरदुपारी एका युवा हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला असून, व्यापारी, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पुकारलेल्या 'श्रीरामपूर बेमुदत बंद'ला (Ahilyanagar Shrirampur Band) मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर कडकडीत बंद राहिले.(Ahilyanagar Shrirampur Band)

Continues below advertisement

Ahilyanagar Shrirampur Band : भरदुपारी हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या

नेवासा रस्त्यावरील 'हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग' येथे शनिवारी दुपारी ३ वाजता अत्यंत किरकोळ कारणावरून तिघा मद्यधुंद तरुणांनी हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबय्या (वय ३४) यांची निर्घृण हत्या केली. या धक्कादायक हत्याकांडामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहराला जबर धक्का बसला. या घटनेने शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि ढासळती कायदा-सुव्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आणली आहे.

Ahilyanagar Shrirampur Band : पोलीस ठाण्यासमोर ४ तास मृतदेह ठेवून ठिय्या

या हत्येनंतर रविवारी संपूर्ण शहरात तीव्र रोष निर्माण झाला. संतप्त श्रीरामपूरकर आणि दुबय्या परिवाराने थेट आकाश यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणला. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा आरोप करत, रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांवर 'मोक्का' (MCOCA) कायद्यान्वये कारवाईचे लेखी पत्र मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. पोलीस ठाण्यासमोर तब्बल चार तास हे मृतदेहासह ठिय्या आंदोलन आणि जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

Continues below advertisement

यावेळी मृत आकाश यांच्या आई व कुटुंबातील इतर महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. "माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करा," अशी संतप्त व आर्त भावना त्यांनी बोलून दाखवली. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वांनी लावून धरली.

Ahilyanagar Shrirampur Band :  सर्वपक्षीय नेते एकवटले

शहरातील या गंभीर परिस्थितीनंतर सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले. या आंदोलनात माजी आमदार हेमंत भोसले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, श्रीनिवास बिहाणी, प्रकाश चित्ते, संजय छल्लारे, अशोक थोरे, केतन खोरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahilyanagar Shrirampur Band :  जिल्हा पोलीस प्रमुखांचे लेखी आश्वासन

आंदोलनाची तीव्रता पाहून अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपअधीक्षक जयदत्त भवार यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक जिल्हा पोलीस प्रमुखांना बोलावण्याच्या मागणीवर ठाम राहिले. अखेर, सायंकाळी ४ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन स्वतः घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी शहरातील सर्वच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि वरिष्ठांना येथील गुन्हेगारीचे गांभीर्य समजावून सांगून कडक कारवाई केली जाईल, असे लेखी पत्र आंदोलकांना दिले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मागण्या मान्य करत लेखी पत्र दिल्यानंतर, तब्बल चार तासांनी मृतदेह दुबय्या यांच्या घरी नेण्यात आला.

Ahilyanagar Shrirampur Band :  व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त बंद

रविवार सकाळपासूनच शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. महात्मा गांधी चौकापासून ते पोलीस ठाण्यापर्यंत नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. या आंदोलनामुळे आणि नागरिकांच्या पवित्र्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला होता. सध्या शहरातील वातावरण तणावपूर्ण शांततेत असून, नागरिकांचे डोळे आता पोलिसांच्या प्रत्यक्ष कारवाईकडे लागले आहेत.