पुणे : नाशिकमधील भोंदू अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या संतापजनक घटनेनं महाराष्ट्र हादरला असतानाचा बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनाही काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. पिंपरी-चिंचवड (Pune) शहरातील मोशी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विनायकनगर येथील शिवशंभो कॉलनीमध्ये एका 40 वर्षीय नराधमाने सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्त्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर, चिमुकलीच्या आईने तात्काळ एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत या नराधमाविरुद्ध तक्रार नोंदवली. रामु कुंजल निसाद (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64 (1), 65 (2), 74, 351 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या कलम 4, 6, 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून बदलापुरातील एका शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता, या घटनेनं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
