Parbhani Crime news: परभणी (Parbhani) येथे चालत्या स्लीपर बसमधून एका 19 वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर नवजात बाळाला बसच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पाथरी सेलू रस्त्यावर 15 जुलै रोजी घडला होता. महिलेचा पती असल्याचा दावा करणाऱ्या एका पुरूषाने तिला चालत्या बसच्या खिडकीतून नवजात बाळाला फेकण्यास मदत केल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान या प्रकरणात आता नवजात बालकाचा पोस्टमार्टम अहवाल समोर आला आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, संत प्रयाग ट्रॅव्हल्सच्या स्लीपर बसमधून रितिका ढेरे नावाची महिला, तिच्यासोबत असलेल्या अल्ताफ शेखसोबत पुण्याहून परभणीकडे जात होती. यावेळी तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. प्रवासादरम्यान तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, काही वेळातच या दोघांनी नवजात बाळाला कापडात गुंडाळून बसच्या खिडकीतून बाहेर फेकले होते.


जागरूक नागरिकाने पोलिसांना दिली माहिती


बसचालकाच्या म्हणण्यानुसार, त्याने खिडकीतून काहीतरी फेकले जाताना पाहिले, तेव्हा त्याने चौकशी केली असता अल्ताफ शेख याने सांगितले की, त्याच्या पत्नीला प्रवासामुळे मळमळ झाली आणि उलट्या झाल्या. मात्र काही अंतरावर, रस्त्यावरून जाणाऱ्या एका जागरूक नागरिकाने खिडकीतून फेकलेली वस्तू पाहिली आणि ते बाळ असल्याचे लक्षात आल्यावर त्याने तात्काळ पोलिसांच्या 122 हेल्पलाइनवर कॉल करून माहिती दिली होती .


बाळ फेकल्याची दिली कबुली


घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांच्या गस्ती पथकाने तत्काळ त्या स्लीपर बसचा पाठलाग करून ती थांबवली. प्राथमिक चौकशीत, जोडप्याने बाळ सांभाळण्याची जबाबदारी न घेता त्याला फेकल्याची कबुली दिली होती. रितिका ढेरे आणि अल्ताफ शेख, हे मूळचे परभणीचे रहिवासी असून गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होते. त्यांनी पोलिसांना आपण पती-पत्नी असल्याचा दावा केला असला तरी, ते कोणतेही अधिकृत कागदपत्र सादर करू शकले नाहीत. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले होते. रितिका ढेरेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


डोक्याला मार लागल्याने बालकाचा मृत्यू


या प्रकरणात आता नवजात बालकाचा पोस्टमार्टम अहवाल समोर आला आहे. हेड इंजुरीमुळे बालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोपींविरोधात पाथरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अल्ताफ शेख हा पोलिसांच्या ताब्यात आहे. पोस्टमार्टमच्या अहवालानंतर जिवंत बालकाला गाडी बाहेर फेकल्याचं स्पष्ट झाले आहे.



आणखी वाचा 


Dipak Kate: प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणात मोठी अपडेट; जानेवारीत काटेच्या बॅगमध्ये सापडलेल्या पिस्तुलाची मॅगझिन अन् काडतुसं फॉरेन्सिक लॅबला पाठवणार