Palghar Crime : पालघर (Palghar) जिल्ह्यातील तलासरीमधल्या (Talasari) झरीतील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide) केली. या विद्यार्थ्याने बाथरुममध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. अलेश विनय लखन असं या 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो तलासरी तालुक्यातील सावरोळी उधानपाडा इथला मूळचा रहिवासी होता. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


प्रेम प्रकरणाच्या नैराश्यातून आयुष्य संपवल्याचा पोलिसांना संशय


झरीतील  ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येतं. अलेश हा अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. प्रेम प्रकरणाच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे 'अलेश डेथ आणि व्हॉट आय डू?' असं मृत अॅलेसच्या हातावर लिहिलं असल्याची माहिती समोर आली आहे.


आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


दरम्यान ॲलेसला बाथरुममध्ये लटकलेला पाहताच वसतिगृह व्यवस्थापन आणि वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्यावेळी त्याला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं. महाविद्यलय प्रशासनाने याची माहिती तलासरी पोलिसांनी दिली. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासणीला सुरुवात केली आहे. मात्र या संपूर्ण  घटनेमुळे आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


मागील वर्षी आश्रम शाळेत बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळफास


आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत असल्याचं प्रकार पुढे येत आहे. मागील वर्षी देखील विक्रमगड तालुक्यातील साखरे इथल्या आश्रमशाळेत बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने 6 जुलै 2022आज दुपारी 12 ते 3 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती.


दोन महिन्यांपूर्वी उच्चशिक्षिक तरुणीने आयुष्य संपवलं


वाडा तालुक्यातील निंबवली इथल्या एका उच्चशिक्षित तरुणीने दोन महिन्यांपूर्वी (12 डिसेंबर 2022) नैराश्यातून आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. समोर आली आहे. ममता परेड (वय २४ वर्षे) असं तरुणीचं नाव होतं. ही तरुणी आपल्या कुटुंबासह राहत होती. तिचे एमए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि ती पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. त्याचप्रमाणे तिने पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयामधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. ममताला वसई-विरार महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरी देखील लागली होती आणि कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी तिने टोकाचे पाऊल उचललं.