युवकाने मित्राच्या मदतीने स्वत:चंच केलं अपहरण, आई-वडिलांकडे मागितले 3 लाख; पोलिसांपुढे बनाव उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री रोहनच्या कुटुंबाला एक व्हिडिओ क्लिप मिळाली, ज्यात रोहन अज्ञात ठिकाणी दोरीने बांधलेला दिसत होता

पालघर : आपल्या आवडीनुसार काम करण्यासाठी अनेकदा मुले कुटुंबीयांचा विरोध करतात. तर, आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन नोकरी करावी किंवा कुटुंबीयांचे ऐकून, त्यांचा सल्ला घेऊनच उद्योग करावा, अशी अपेक्षाही पालकांची असते. मात्र, अनेकदा पालकांच्या विरोधास न झुगारता मुले पैसा कमविण्यासाठी घरच्यांचीच फसवणूक करतात. पालघर (Palghar) जिल्ह्याच्या नालासोपारा येथील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. स्वतःचा प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी कुटुंबाकडून पैसे मिळावेत, यासाठी नालासोपाऱ्यातील एका 22 वर्षीय तरुणाने स्वतःच्या बनावट अपहरणाची योजना रचली. अखेर, पोलिसांनी (Police) या युवकाचा बनाव उघडा पाडला असून या प्रकरणात आचोळे पोलिसांनी संबंधित तरुण रोहन तिवारी आणि त्याचे दोन मित्र कौशल दुबे (21) आणि निखिल सिंग (22) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री रोहनच्या कुटुंबाला एक व्हिडिओ क्लिप मिळाली, ज्यात रोहन अज्ञात ठिकाणी दोरीने बांधलेला दिसत होता आणि दोन तरुण त्याला मारहाण करताना दिसत होते. या व्हिडिओमध्ये रोहनच्या चेहऱ्यावरून रक्त वाहतानाही दाखवण्यात आले होते. या व्हिडिओतील आरोपींनी रोहनाच्या कुटुंबीयांकडे 3 लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. तसेच, पैसे न दिल्यास रोहनला ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे, व्हिडिओ पाहिल्यानंतर रोहनच्या काकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. आचोळे पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.
प्राथमिक चौकशीत रोहनचा फोन ट्रेस करताच तो चेंबूर परिसरात असल्याचे समोर आले. शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, रोहनचे लोकेशन मिळण्याआधीच त्याचा फोन बंद झाला. पोलिसांच्या सांगण्यावरून कुटुंबीयांनी आरोपींना 5,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. तथापि, यानंतरही रोहनचा काहीच संपर्क झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि त्याचे दोन मित्र चेंबूरमधील एका हॉटेलमध्ये नाश्ता करताना आढळून आले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात आधीच पोलिसांना माहिती दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आणि चौकशीदरम्यान रोहनने अपहरणाचे संपूर्ण नाटक केले असल्याची कबुली दिली.
व्यवसाय सुरू करण्यासाठी केला बनाव
पोलिसांच्या चौकशीत उघड झाले की, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले पैसे मिळवण्यासाठी रोहनने आपल्या मित्रांच्या मदतीने हा बनाव केला होता. त्यामध्ये रोहनच्या चेहऱ्यावर खून झाल्याचा भास निर्माण करण्यासाठी मेकअप देखील करण्यात आला होता. सध्या तिघांवर फसवणूक, खंडणी आणि पोलिसांची दिशाभूल केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, आचोळे पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा
पुण्यात वासनांध नराधमाचा कुत्रीवर अत्याचार; 'ते' पाहून मालकाला आला संशय, परिसरात संतापाची लाट
























