Online Fraud: ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. फसवणूक करणारे गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक सुरू असते. मोबाइलवर कॉल करून फसवणूक करून बँक अकाउंटमधील पैसे चोरले जातात. आता ऑनलाइन फसवणुकीसाठी (Online Fraud) नवा फंडा वापरला जात आहे. फसवणूक करणाऱ्यांकडून सध्या QR Code चा आधारे फसवणूक करण्यात येत आहे. तुम्ही QR Code स्कॅन केल्यानंतर तुमच्या खात्यातील रक्कम स्कॅमर्सच्या खात्यात वळती होते. अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत काही सिक्युरिटी रिसर्च फर्म यांनी सावधानतेचा इशारा दिला होता. 


QR Code स्कॅम हा फसवणुकीचा नवीन प्रकार नसल्याचे जाणकार सांगतात. OLX वरदेखील अनेकजण अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडतात. एका महिलेने OLX वर काही वस्तू विक्रीसाठी लिस्ट केल्या होत्या. त्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्कॅमर्सने मेसेज पाठवला. 


या स्कॅमरने महिलेने निश्चित केलेल्या दरावर वस्तू खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर त्याने व्हॉट्सअॅपवर महिलेला QR कोड पाठवले. आपण वस्तूंची खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यासाठी ऑनलाइन पेमेंट करण्यास तयार असल्याचे सांगत PhonePe अथवा  GPay मधून कोड स्कॅन करावा आणि यूपीआय पिन  क्रमांक नमूद करण्यास सांगितले. 


या महिलेने यूपीआय पिन नमूद करताच तिच्या खात्यातून मोठी रक्कम दुसऱ्या खात्यावर वळती झाली होती. या महिलेने झाल्या प्रकाराची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. 


QR Code स्कॅन करताना सावधानता बाळगा


QR Code स्कॅन करून अनेक ठिकाणी पेमेंट केले जाते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी QR Code स्कॅन करताना काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य ती खबरदारी घेतल्यास QR Code द्वारे होणारी फसवणूक टाळता येऊ शकते. 


स्कॅमर्सकडून पेट्रोल पंप अथवा दुकानांमध्ये लावण्यात आलेले QR Code बदलून स्वत: चा QR Code लावला जातो. त्यामुळे पेमेंट करता त्यावेळे खात्यातून स्कॅमर्सच्या खात्यात पैसे जातात. याबाबतची माहिती बऱ्याच उशिराने कळते. त्यामुळे शॉपवर, पेट्रोल पंपवर पेमेंट करताना QR Code स्कॅन केल्यानंतर व्हेरिफाइड नाव दिसल्यानंतर दुकानदाराकडून त्याचे नाव कन्फर्म करून घ्या.  


जर, QR Code स्कॅन केल्यानंतर एखाद्या अनोळखी वेबसाईटवर रिडायरेक्ट केले जात असेल तर तुम्ही अधिक सावध होण्याची आवश्यकता आहे. 


इतरांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी तुम्हाला QR Code स्कॅन करून पिन क्रमांक नमूद करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. जर, तुम्हाला एखादी व्यक्ती पेमेंट पाठवण्यासाठी तुम्हाला QR Code स्कॅन करायला सांगत असेल तर तसे करू नये आणि या प्रकारची माहिती तात्काळ सायबर पोलिसांना द्या.