मुंबई: सोशल मीडिया साईट इंस्टाग्रामवर तरुणीशी ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ बनवून व्हायरल करणाऱ्या आरोपीस मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दिलदार खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


आरोपीने सोशल मीडिया इंस्टाग्राम या साईटवर तरुणीसोबत ओळख पटवली आणि त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीला विश्वासात घेऊन आरोपीने विवस्त्र अवस्थेत तरुणीला आक्षेपार्ह व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. त्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर बोगस अकाउंटवरून व्हायरल केले.


याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आरोपी दिलदार खान याला अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.


अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक 


मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या सराईत आरोपीला अंधेरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद तनवीर अली इमाम अन्सारी (वय 30 वर्ष) असून तो माहीम इथला राहणारा आहे. आरोपी मोहम्मद तनवीर अली हा अंधेरी पूर्वेत आंबेवाडी परिसरात लहान मुलगी खेळत असताना तिचा विनयभंग करून पळून गेला होता. 


मुलीच्या पालकांनी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोन वेगवेगळ्या पोलिसांच्या टीम बनवून आरोपीला माहीम परिसरातून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा सराईत आरोपी असून त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद आहे. सध्या अंधेरी पोलिसांनी आरोपीला अटक करून अधिक तपास करत आहे.