Nursing Exam Paper Leak: राज्यात विविध परीक्षांचे पेपर फुटण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षांमधील घोटाळ्यानंतर आता नर्सिंगचा (Nursing Exam) पेपरही फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परभणी येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा पर्यवेक्षिकेनेच (Exam Supervisor) आपल्या बहिणीसाठी मोबाईलवरून प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून व्हॉट्सॲपवर (WhatsApp) पाठवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नानल पेठ पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Continues below advertisement

Nursing Exam Paper Leak: नेमकं काय घडलं?

परभणी शहरातील इंदिरा गांधी एएनएम नर्सिंग स्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची परीक्षा सुरू आहे. 20 ऑगस्ट रोजी सकाळी जी.एन.एम. प्रथम वर्षाचा पेपर आयोजित करण्यात आला होता. परीक्षा सुरू होताच सकाळी 10:29 वाजता तेथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या राखी चव्हाण यांनी आपल्या मोबाईलवरून प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले. त्यांनी हे फोटो तातडीने व्हॉट्सॲपद्वारे आपली बहीण राणी चव्हाण हिच्या मोबाईलवर पाठवले.

Nursing Exam Paper Leak: केंद्र निरीक्षकांच्या तपासणीत झाला भांडाफोड

परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर गेल्याची शंका आल्यानंतर केंद्र निरीक्षक विश्वजीत मठपती यांनी संबंधित महिला पर्यवेक्षिकेची झाडाझडती घेतली. तिच्या मोबाईलची तपासणी केली असता, मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याचे स्पष्ट निदर्शनास आले. परीक्षा केंद्रावरील प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्याची जबाबदारी असतानाही  बेकायदेशीरपणे मोबाईलचा वापर केल्याचे सिद्ध झाल्याने तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले.

Continues below advertisement

Nursing Exam Paper Leak: पाच जणांवर गुन्हा, 4 जणांना जामीन

केंद्र निरीक्षकांच्या तक्रारीवरून नानल पेठ पोलिसांत राखी चव्हाण, राणी चव्हाण, प्रतीक्षा किरण खिल्लारे, ईश्वर बाराबोईना आणि दिलीप बोरकर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चार जणांना न्यायालयात (Court) हजर केले असता त्यांना जामीन मंजूर झाला आहे, तर दिलीप बोरकर यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Nursing Exam Paper Leak: पोलीस आणि संस्थाचालकांची मौन बाळगण्याची भूमिका

हा प्रश्नपत्रिकेचा फोटो नेमका आणखी कोणाकोणाला पाठवण्यात आला? तो सोशल मीडियावर किती व्हायरल झाला? यामागे काही मोठे रॅकेट आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मात्र, या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तोंडी माहिती दिली असली तरी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. तसेच इंदिरा गांधी नर्सिंग स्कूलचे प्राचार्य मोहम्मद मोईनुद्दीन यांनीही याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Amit Thackeray Nashik: कायद्याच्या बालेकिल्ल्यात टवाळखोरांचा त्रास; विद्यार्थिनींची थेट अमित ठाकरेंकडे तक्रार, आता नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, नेमकं प्रकरण काय?