NEET Exam Paper Leak: रसायनशास्त्राचा प्राध्यापक ते NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड, सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या पी. व्ही. कुलकर्णीची संपूर्ण कुंडली!
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणाचा 'मास्टरमाईंड' लातूरचा माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

NEET Exam Paper Leak: देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी (NEET Exam Paper Leak) आणि कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सर्वात मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार म्हणजेच 'मास्टरमाईंड' लातूरचा माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सीबीआयने त्याला पुण्यातून अटक केली असून आज त्याला दिल्लीतील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अतिशय गोपनीय अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी कुलकर्णी संबंधित असल्याने शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Who is P V Kulkarni: कोण आहे प्रा. पी. व्ही. कुलकर्णी?
पी. व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा (Chemistry) नामांकित प्राध्यापक आहे. लातूर येथील नामांकित 'दयानंद महाविद्यालयात' कुलकर्णीने तब्बल 28 वर्षे अध्यापनाचे काम केले आहे. 5 ते 6 वर्षांपूर्वी तो सेवेतून निवृत्त झाला होता. लातूरच्या 'शिक्षण पंढरी'त बारावी विज्ञान शाखा आणि मेडिकल प्रवेश परीक्षांच्या (NEET) मार्गदर्शनासाठी त्याचा मोठा दबदबा होता. कुलकर्णी याचे लातूरमधील कैलास नगर येथे निवासस्थान आहे, मात्र त्याचे कुटुंबीय पुण्यात राहत असल्याने त्याचे लातूरमधील वास्तव्य कमी झाले होते. निवृत्तीनंतर तो पुण्यातच राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता.
NEET Exam Paper Leak: 'एनटीए'च्या विश्वासाला तडा; असा फोडला पेपर
प्रा. पी. व्ही. कुलकर्णी हा थेट 'NTA'च्या नीट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अत्यंत गोपनीय समितीशी संबंधित काम करत होता. प्राध्यापक असल्याने आणि परीक्षा प्रक्रियेत थेट सहभाग असल्याने त्याला मूळ प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश (Access) होता. याच पदाचा आणि विश्वासाचा गैरवापर करून कुलकर्णीने केमिस्ट्रीचा पेपर फोडल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णीने आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना एकत्र केले होते. परीक्षेपूर्वीच या विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाठ करण्यास भाग पाडण्यात आले होते.
NEET Exam Paper Leak: विषय ठरवून पेपर लीक; नाशिकच्या खैरनारशी कनेक्शन
सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक पॅटर्न समोर आला आहे. नीट घोटाळ्यातील आरोपींनी पेपर फोडण्यासाठी आपापसात विषय वाटून घेतले होते. प्रा. पी. व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा तज्ज्ञ असल्याने त्याच्याकडे केमिस्ट्रीचा पेपर फोडण्याची जबाबदारी होती. तर नाशिकचा शुभम खैरनार हा आरोपी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने बायोलॉजीचा पेपर फोडायचा. NEET परीक्षेत एकूण 700 मार्कांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांची परीक्षा द्यावी लागते. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याचे आश्वासन या टोळीने दिले होते. मात्र, तपास यंत्रणांना संशय येऊ नये म्हणून ही टोळी संपूर्ण 700 मार्कांचा पेपर एकत्र न फोडता, अशा प्रकारे विषयवार (Subject-wise) तुकड्या-तुकड्यांमध्ये पेपर लीक करायची.
NEET Exam Paper Leak: मनीषा वाघमारेचे कनेक्शन आणि आर्थिक व्यवहार
प्रा. कुलकर्णी हा पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिच्या संपर्कात आले होते. मनीषाच्या माध्यमातून त्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांशी संपर्क साधला. या संपर्कातूनच नीटच्या पेपरफुटीचा मोठा आर्थिक व्यवहार आणि कोट्यवधींची डील झाल्याचे तपासात उघड झाले आहे. याच धागादोर्यांचा माग काढत सीबीआयने लातूर आणि पुण्यात छापे टाकून मोठी कारवाई केली. या अटकेसह नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरातून अटक झालेल्या एकूण आरोपींची संख्या आता 8 वर पोहोचली आहे.
आणखी वाचा
Before You Go
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!





















