NEET Exam Paper Leak: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासातून आता अत्यंत धक्कादायक आणि मोठे खुलासे समोर आले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) पॅनलवरील फिजिक्स (Physics) विषयाच्या तज्ज्ञ मनीषा संजय हवालदार हिला पुण्यातून अटक केल्यानंतर, सीबीआयने केलेल्या फॉरेन्सिक तपासणीत (Forensic Investigation) अनेक गुपिते उघड झाली आहेत. मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' (God) नावाने सेव्ह असलेला संशयास्पद क्रमांक तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

NEET Exam Paper Leak: मोबाईलमधील 'गॉड' आणि 'डॉ. उषा' तपासाच्या केंद्रस्थानी

सीबीआयने सदाशिव पेठेतील हवालदारच्या निवासस्थानी 22 मे रोजी घेतलेल्या झाडाझडती दरम्यान मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि नीट प्रश्नपत्रिकेच्या प्रती जप्त केल्या होत्या. हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ आणि ‘डॉ. उषा’ या नावांनी सेव्ह असलेल्या क्रमांकांसोबत झालेले संशयास्पद संवाद सीबीआयला आढळून आले आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीट पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवणे आणि पैशांची देवाणघेवाण करणे ही कामे तेजस शहाच्या माध्यमातून केली जात होती.

NEET Exam Paper Leak: पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्स जाळल्या आणि चॅट केले डिलिट

चौकशीची चाहूल लागताच आरोपी मनीषा हवालदार हिने पुरावे नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तिने स्वतः तयार केलेल्या फिजिक्स विषयाच्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स जाळून खाक केल्या, जेणेकरून तपास यंत्रणांच्या हाती कोणताही लेखी पुरावा लागू नये.  केवळ लेखी पुरावेच नव्हे, तर डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी तिने सहआरोपी आणि बायोलॉजी विषयाची प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यासोबत केलेले सर्व व्हॉट्सॲप चॅट्स आणि मेसेजेस डिलीट केले होते. विशेष म्हणजे, मनीषा हवालदार हिने स्वतःच्या फोनसोबतच पतीच्या मोबाईलचा वापर करूनही मनीषा मांढरेला प्रश्नमालिका पाठवल्या होत्या. सीबीआय आता हे तांत्रिक पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे.

NEET Exam Paper Leak: घराच्या झाडाझडतीत रोकड जप्त

मनीषा हवालदार हिने आर्थिक मोबदल्यासाठी मनीषा मांढरे हिच्याशी संगनमत करून काही विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवले होते. या बदल्यात तिने मोठी रोख रक्कम स्वीकारल्याची कबुली दिली आहे. सीबीआयला तिच्या घरातून 1 लाख 1 हजार 930 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात यश आले आहे.  

NEET Exam Paper Leak: NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ रडारवर

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात एनटीए पॅनेलमधील रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. अटक मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिने चौकशीत या तज्ज्ञाच्या सांगण्यावरून प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर, प्रिंटिंग आणि डिजिटल ट्रान्सफर प्रक्रियेत गळती झाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे  पुणे, लातूर आणि राजस्थानपर्यंत तपासाचा विस्तार झाला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

NEET Paper Leak : संशयास्पद चॅट्स अन् 'GOD' नावाचा नंबर; मनीषा हवालदारच्या पतीचा मोबाईलमध्ये सापडली चॅटिंग, व्हॉट्सॲप मेसेजेस डिलीट