Naxal :  2010 पासून बेपत्ता असलेला पुण्यातील नक्षलवादी संतोष शेलार उर्फ पेंटर पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत आहे. शेलार सध्या गंभीर आजाराने ग्रासला आहे. त्यासाठी उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाला आहे. शेलार सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या देखरेखीत आहे. 


संतोष शेलार उर्फ विश्व उर्फ पेंटर हा तरुण 2010  पासून बेपत्ता होता. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बंदी घातलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा त्यावर आरोप आहे. संतोष शेलार याला शहरातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो सध्या एटीएसच्या नजरेखाली आहे. संतोष शेलार हा माओवादी संघटनेत सक्रीय असून कमांडरपदी कार्यरत असल्याचे वृत्त समोर आले होते. 


पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी भागात राहणारा संतोष वसंत शेलार हा 7 नोव्हेंबर 2010 पासून बेपत्ता झाला होता. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी खडक पोलीस ठाण्यात दिली होती. पुण्यात अंजला सोनटक्केने माओवादी विचारधारेचा प्रसार करून तरुणांना जाळ्यात ओढल्याचा आरोप होता. त्यानंतर पुण्यातील ताडीवाला रस्ता भागातील एक तरुण आणि शेलार बेपत्ता झाले होते. शेलारच्या कुटुंबीयांनी संतोषचा संबंध हा कबीर कला मंचच्या काही कार्यकर्त्यांशी आला होता. त्यानंतर अचानकपणे तो एकाकी बेपत्ता झाला असल्याचा दावा शेलार कुटुंबीयांनी केला होता. 


2019 मध्ये छत्तीसगड पोलिसांच्या यादीत संतोषचे नाव 


छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील नक्षलविरोधी ऑपरेशन टीमने तांडा एरिया कमिटीमध्ये 2019 मध्ये वॉन्टेड माओवाद्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत विश्व माओवादीचे नाव चौथ्या क्रमांकावर होते.तो एरिया कमिटीचा डेप्युटी कमांडर असल्याचे नक्षलविरोधी पथकाने म्हटले होते. त्याच्याकडे 303 रायफल असल्याचे सांगण्यात आले होते. 


संतोष शेलार हा नक्षलवाद्यांच्या सशस्त्र पथकांमध्ये सहभागी झाल्याची माहिती 2014मध्ये गडचिरोली पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर तो माओवाद्यांचा  कमांडर झाल्याची माहिती समोर आली. शेलार हा पुण्यातील नक्षलवादी अंजला सोनटक्के आणि माओवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे यांच्या संपर्कात संतोष आला होता. त्यानंतर तो नक्षली चळवळीत सहभागी होऊन भूमिगत झाल्याची माहिती आहे. दोन वर्षापूर्वी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाला होता. 


पुण्यात 2017 मध्ये एल्गार परिषद पार पडली होती. या एल्गार परिषदेत शहरी नक्षलवादी असल्याचा आरोप करत महाराष्ट्र एटीएसने आणि एनआयएने कारवाई करत काही जणांना अटक केली होती. यामध्ये आदिवासी आणि सामाजिक चळवळीत सक्रीय असणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.